Friday, April 23, 2021

वीर गाव रम्य त्या आठवणी - भाग १

 

(२३ एप्रिल २०२० रोजी कोविद १९ महामारीमुळे स्वतंत्र भारतातील पहिला कॉव्हिड 19, लॉकडाउनला झाला आणि आम्ही वीर येथे आमच्या गावाला जाऊ शकलो नाही.)

या वर्षी फक्त आणि फक्त आठवणी:

आमचा वीर गाव, दोन धबधबे, एक बंदर, दोन्ही डोंगरावर १४ वाड्या, मधून शांत नदी वाहते, त्यात पाण कोळी, एक सारखे येऱ्या झाऱ्या घालत असतात. कधी कधी रंगीत मासे सुद्धा बघायला मिळतात. त्यातच एखादा रायवळ आंबा धाडकन पडतो आणि सर्व धावतात तो घ्यायला, मग काय धडपडून खरचटते पण सांगणार कोणाला, आई धपाटा घालेल. मेध्यावर जांभूळ आणि बकुळीची रास सडा घालते. डोहात घुसळून घुसळून लाल पाण्यात अंघोळ होते. गणपतीची घंटा वाजते, आणि आम्ही टॉवेल सावरत बघतो कोण आलंय का बघत. कोणीतरी नवीनच पाहुणी असते, मग चौकशा सुरू.

तेवढ्यात म्हशी येतात पाण्यावर आणि आम्ही घराकडे निघतो. गोळा केलेली जांभळे तशीच रहातात आणि बकुळ मात्र पाहुणीला मिळतात. जाताना करवनदाची पिपाणी करून वाजवायला विसरत नाहीत आणि दुपारी फणसाची भाजी आणि तांदळाची भाकरी.

दिवसभर गाढव, गाढव, डब्बा ऐसपैस, बंड्या बरोबर विटीदांडू, एक संपला की दुसरा खेळ सुरूच. भांडणे कधी मिटतात आणि गोडी कधी होते तेच कळले नाही आजपर्यंत.

संध्याकाळी बंदरात चालत 2 की मी. फक्त 40 मिनिटात आणि मग जितू (गावचा नावाडी, बिचारा वाट बघत असतो आम्ही केव्हा येतो ते) येऊन डीपको मधून फिरवून आणतो. अशा पुड्या सोडतो की आयकतच रहावे.

रात्री थालीपीठ, भाजणी चा तळ, सांजण, वडे पावटे, दुसऱ्या दिवशी सकाळ चा विचार करता हदडतो.

सकाळ संध्याकाळ आंबच आंबा, खाऊन खाऊन डोक्यावर प्रसाद उमटतो.

रात्री शेजारची शुभांगी पत्ते खेळायला येते तिच्या हसण्याने सारे वीर गाव जागते.

असे करता करता मे संपतो आणि बॅक टू मुंबई. पुन्हा भेटायचे ठरवून घरी निघतो. काकू कुंपणापर्यंत रडत रडतच सोडायला येते कारण परत वर्षभर तिला कोणी भेटणार नसते.

माधव भोळे (30.04.2020)

















No comments:

Post a Comment

वीर गाव, रम्यवीर गाव, रम्य त्या आठवणी ८ (पहाट !!)

 वीर गाव, रम्यवीर गाव, रम्य त्या आठवणी ८ (पहाट !!) पूर्वी आमच्या लहानपणी, कोकणात आम्ही पहाटे उठायचो त्यावेळी उजडत नाही तर आमची काकू म्हशीच्य...