Sunday, July 6, 2025

वीर गाव, रम्यवीर गाव, रम्य त्या आठवणी ८ (पहाट !!)

 वीर गाव, रम्यवीर गाव, रम्य त्या आठवणी ८ (पहाट !!)


पूर्वी आमच्या लहानपणी, कोकणात आम्ही पहाटे उठायचो त्यावेळी उजडत नाही तर आमची काकू म्हशीच्या गोठ्यात दूध काढायला जायची, त्यावेळी आमच्याकडे एक म्हैस आणि तिचे रेडकू असायचे. बाजूच्या यमूवहिनीकडे कामवाली सीताबाई घिरटीवर भाकरीचे पीठ दळत असायची. आई लवकर आंघोळ करून देवघरात साफ सफाई करून देवांच्या पूजेची सिद्धता करायची. एरवी पक्षांच्या किलबिलाटा ने धुंद झालेला  परसव,  चैत्रामध्ये कोकिळेच्या मधुर परंतु उच्च स्वरानि दणाणून जायचा. ताई सकाळच्या न्याहरीची तयारी करायची. 


तेवढ्यात बाहेर पडवीमध्ये झोपाळ्या वर बसलेल्या बाबांचा ( आम्ही त्यांना मामा म्हणत असू) आवाज यायचा, "अहो, विष्णुपंत आले आहेत, म्हटले कॉफी ठेवा". ही बाबांची सकाळ पासूनची दुसरी कॉफी असायची.


विष्णुपंत वीरला एकटेच यायचे, त्यांच्या घरच्या मंडळींना वीरची आवड नव्हती. ते कोर्टात नोकरीला होते. मे महिना आणि दिवाळी मध्ये त्यांना भरपूर सुट्या मिळायच्या. दादरच्या डबलरूम मध्ये त्यांचा जीव गुदमरायचा. कोर्टाला सुटी लागली की हे हमखास वीरला यायचे. बरेच वेळा आमच्याकडे जेवायला असायचे. 

एकदा विष्णुपंत आले की त्यांच्या वडिलांबरोबर गप्पा रंगायच्या मग देवपूजा दोन तास पुढे ढकलली जायची. आमच्या वडिलांना सुद्धा वीर गाव फार आवडायचा. म्हणायचे आमची नाळ येथे पुरली आहे. 


आम्ही कच्ची बच्ची मंडळी शाळेत जायची घाई नसल्यामुळे जास्तीत जास्त वेळ झोपायला कसे मिळेल याकडे आमचा कल असायचा. एरवी मुंबईत शाळेमुळे नाईलाजाने लवकर उठायला लागायचे, त्यात मे महिन्यात मुंबईमध्ये पाण्याचा तुटवडा असल्यामुळे शेजारच्या चाळीतून पाणी भरायची वेळ यायची, त्यामुळे वडील सर्वांची रवानगी १५ एप्रिल लाच वीरला करायचे. मामा (बाबा) १५ मे ला कोर्टाला सुट्टी पडली की यायचे. तेथपर्यंत आमचा रिझल्ट लागलेला असायचा. आम्हाला धास्ती असायची की मामा शाळेत जाऊन आपला रिझल्ट आणतील की नाही. मामाना विचारले की रिझल्ट काय लागला तर कधीच सांगत नसत. म्हणायचे आता जून ला शाळेत जाशील तेव्हा बघ. सम्पूर्ण सुटी ते आम्हाला आनंदात घालवू द्यायचे. 


सकाळी ९ वाजले की आम्हाला मेद्याच्या डोहावर जाण्याचे वेध लागले असायचे. कसे बसे ताईने केलेला गावठी तांदळाचा गुरगुट्या भात आणि त्याबरोबर मेतकूट किंवा फोडणीची मिरचीचे चार घास पोटात टाकले की झाली न्याहारी. त्यावेळी आता सारखे न्याहारीला पोहे, उपमा, इडली, ढोकळा सारखे पदार्थ म्हणजे काय हे सुद्धा माहिती नव्हते. पण त्याबद्दल कधी काहीच वाटले नाही. म्हणतात ना अज्ञानात आनंद असतो आणि ज्ञानी माणूस दुःखी असतो कारण तो माझ्याकडे काय आहे यापेक्षा मला काय मिळत नाही याचा नेहमी विचार करतो, म्हणून दुःखी असतो.


२ तास डोहात मनसोक्त डुंबल्यानंतर स्वारी घरी यायची. येथपर्यंत अर्धा दिवस  कसा जायचा कधीच कळले नाही.


आता अलीकडे शहरात काय किंवा गावी सुद्धा पहाटे उठायचे सोडाच पण सकाळी ७ नंतर उठल्या उठल्या कुटुंबातील बहुतेक सदस्य आपापले मोबाईल घेऊन एकमेकांना किंवा ग्रुपवर शुभ सकाळ, शुभ दिवस, शुभ वाढदिवस अशा  अनेक शुभेच्छांचा भडिमार करतात. मग थोड्या वेळाने सुविचारांचा रतीब लागतो आणि ते सुविचार वाचून मानवाची अध्यात्मिक आणि मानसिक प्रगती बघून उर भरून येते आणि खरोखरच विचारशक्ती दिल्यामुळे मानव जगातील सर्वात श्रेष्ठप्राणी असल्याची खात्री पटते!!.


 मग एखादी वाईट बातमीची पोस्ट आली तर लगेच श्रद्धांजली, RIP वगैरे टाकून आपली सामाजिक बांधिलकी मोबाईलवरच जपली जाते. त्यात एखादी मदत कोणी मागितली असेल तर तत्परतेने तो मेसेज पूर्वी कधी आला आहे किंवा त्या मेसेजची मुदत किंवा सत्यतेची शहानिशा न बघता ( कारण अशा मेसेजेसना तारीख किंवा मुदत देण्याचे भान पोस्ट टाकणारच  काय पण इतर कोणी नेटकरी कधीही ठेवताना मी बघितला नाही), तात्काळ फॉरवर्ड करून आपण समाजाला कशी मदत करतो  हे स्वतःलाच समजावले जाते.मग एकेक फॉरवर्ड सुरू होतात आणि आपण किती जागरूक अहोत हे दाखवण्याचा आटोकाट प्रयत्न केला जातो. आणि काहि ठिकाणि तर राजकीय रणकंदन माजते. हे होईपर्यंत सकाळचे ९.३० वाजतात आणि पोटात कावळे ओरडायला लागले की मग घरातील गृहिणी झोमॅटोवर ऑर्डर देण्यापूर्वी प्रत्येकाचा चॉईस विचारून ब्रेकफास्ट ऑर्डर देते.


खरे सांगू मी सिमला, कुलू, मनाली एवढेच काय भारतातील अनेक थंड हवेच्या आणि निसर्ग सौंदर्याच्या ठिकाणी फिरलो आणि राहायलो पण वीर च्या सुट्टीतील मज्जा तेथे कधीच आली नाही. आमचा गाव आडगाव आहे म्हणून तर तो वर्दळी पासून लांब आहे. आणि तो आहे तसाच मला आवडतो. त्याला काही फार मोठे आर्थिक मूल्य नसेल पण निसर्ग, शांतता, समाधान  आणि बरेच काही आहे जे आर्थिक मूल्यापेक्षा जास्त महत्वाचे वाटते.


माधव भोळे 

Thursday, July 7, 2022

आमचे पंढरपूर, "वीर गाव"!!.

आमचे पंढरपूर, "वीर गाव"!!. गाव म्हटले की प्रथम आठवते ते आपले हक्काचे, अर्थातच सर्व परीने सुरक्षित, पिढीजात वाडवडीलांचे गाव. आमच्या भोळे कुटुंबियांचे सुद्धा एक गाव आहे "वीर". कोकणातील वीर हे चिपळूण पासून ४६ किमी अंतरावर, सावर्डे मार्गे वहाळ फाट्याचे शेवटचे गाव. अजूनही तसेच निसर्गाने बहरलेले, बाहेरच्या धावपळीच्या जगापासून दूर!. पूर्वीचा प्रवासाचा मार्ग: लहानपणी १५ एप्रिलला शाळेचे परीक्षेचे पेपर दिले की आम्ही सर्व बच्चे मंडळी मुंबईच्या भाऊच्या धक्क्यावरून चौघुले शिपिंग कम्पनीच्या बोटीने वीर ला जात असू. जाताना गावातील इतर मित्रमंडळी सोबत असत. जणू काही जत्रेलाच जातो. एकदा ब्यागा खाली बोटीच्या हौद्यात टाकल्या की सर्व मंडळी बोटीच्या डेकवर जात. सीट नंबर वगैरे काही भानगड नव्हती. प्रत्येकाने एखादी चटई किंवा सतरंजी हांथरली की ती त्याची जागा झाली. केबिन वगैरे फक्त उच्चभ्रु लोकांसाठी राखीव असायच्या. साधारणपणे सकाळी ९ वाजता बोट सुटायची ती संध्याकाळी ६ ते ६.३० / ७ वाजता जयगड बंदराला लागायची. तो पर्यंत बोटीच्या डेकवरून बाहेर बघितले की चारी बाजूला निळेशार आकाशी पाणीच पाणी. सुरवातीला बोट हलायची अगदी भूकंप होतो तशी, त्यामुळे भीती वाटायची, पण एक दोन तासात त्याची सवय व्हायची. कधी अलिबाग, नागाव च्या नारळी फोफळी तर कधी मुरुड जंजिऱ्याचा किल्ला लांबून दिसायचा तर कधी बाणकोटची खाडी गेल्यावर दापोलीचा नयनरम्य समुद्र किनारा दिसायचा. ते दृश्य अजूनही लक्षात आहे. दुपारी जेवायला आई बटाट्याची भाजी आणि पोळ्या बरोबर आणायची ते खाऊन पितळेच्या फिरकीतल्या तांब्यातील पाणी पिऊन क्षुधा शांती व्हायची. तो फिरकीतला तांब्या वर्षभर दर्शन देत नसे पण गावाला जाताना हमखास दिसायचा. आता बिस्लरीच्या बंद पाणी बाटल्या आल्यामुळे तो तांब्या कोठे आहे ते शोधावे लागेल. बोट मोठी असल्यामुळे जयगड बंदराला लागत नसे, त्यामुळे अब्बास भोई पडाव घेऊन बोटीपर्यंत यायचा, बोटीवरुन सर्वांना बकोटी धरून सुखरूप पडावात उतरवायचा आणि जयगड बंदरात समानासाहित सोडायचा. रात्री जयगड येथे भागवतांच्या खानावळी बाहेर पथारी टाकून सकाळी जयगड-कुरधुंडा लाँचने आम्ही भातगाव येथे जात असू, मग भातगाव ते वीर बंदर एक तासाचा होडी प्रवास आणि वीर बंदर ते घर, दोन किलोमीटर पायी चालत. एव्हडा जवळ जवळ २८ / २९ तासांचा प्रवास करून सुद्धा आम्ही दमलेले नसायचो. घरी आमची एक ७५ वर्षाची अलवणातील ( केशवपन केलेली, लाल लुगडे नेसणारी विधवा ) काकू वाट बघत असायची. बिचारी आपली म्हैस आणि रेडकू सांभाळत वर्षभर एकटी गावात राहायची. घरी गेल्यावर प्रथम अंघोळी आणि सोवळे ओवळे असायचे ते सर्व उरकेपर्यंत ३ वाजायचे. आजकाल सकाळी ७ वाजता गाडीत बसलो की दुपारी एक वाजेपर्यंत घरात दरवाज्यासमोर आपली गाडी उभी करू शकतो इतका फरक झाला आहे. आता बोटी सुद्धा बंद झाल्या आहेत पण बोटीच्या प्रवासाची मजा काही औरच. वीर येथील वास्तव्य: घरात शिरताना एक वेगळाच उत्साह मनात असायचा कारण येथे अभ्यास, परीक्षा याचे काही देणे घेणे नसायचे. दिवसभर हुंदडायचे, केव्हाही मनात आले की नदीत डुबकी मारत मनसोक्त पोहायचे, विटीदांडू, डब्बाऐस पैस, लगोरी, फुल रॅकेट सारखे मैदानी खेळ आणि गाढव (झब्बू), पाच तीन दोन, लेडीज पत्त्यांचे डाव, साप शिडी सारखे बैठे खेळ दिवसभर रंगायचे. मध्येच माझ्या शेजारच्या घरातील गोरगोमटा सुशील कपाळाला कुंकू, नाटकाच्या मेकपच्या सामानातील लिपस्टिक लावून आणि आईची साडी नेसून भावाला शंकासुराचा वेष घालून १० / १५ मिनिटे गावातील नमनाचे खेळे आणि एखादा वघ म्हणून दाखवायचा. फार मजा वाटायची त्यावेळी. सोबत करवंदे, जांभळे, रायवळ आंबे, कैऱ्या, फणसाचे गरे पोटपूजा करायला असायचे, मग उरते तरी कसले टेन्शन?. दोन महिने मुक्त संचार गावातील सर्व घरात होत असे आणि आईच्या डोक्याची कटकट कमी झाल्यामुळे ती सुद्धा आनंदात असायची. रात्री अंधार पडला की मात्र आम्ही सर्वजण चुपचाप घरी हातपाय धुवून देवाला नमस्कार करून घरातील झोपाळ्यावर मोठमोठयाने पर्वचा, रामराक्ष, मारुती स्तोत्र म्हटल्याशिवाय कोणालाही जेवायला मिळत नसे. मग जेवून झाल्यावर रात्री भुताखेताच्या गोष्टी सांगत एखादा ताई किंवा दादा आम्हाला घाबरवीत असे. पूर्वी लाईट नसताना आणि कंदिलाच्या मिणमिणत्या दिव्यात फारच घाबरगुंडी उडायची. आजूबाजूची मुले सुद्धा आमचाकडेच झोपायला येत. एक मोठे जाजम पडवीत घातले की हवी तेव्हडी मुले एकत्र झोपत. त्याकाळी प्रत्येकाला वेगळी गादी, उशी ही नाटके नसायची. आमचे घर आणि परसव: गावात घराच्या पाठच्या अंगणात बसले की डाव्या बाजूला एक कोनकापा फणस, एक आंब्याचे कलम, खालच्या बाजूला परसवात रायवळ आंबा, फणस आणि नारळ अशी आजोबांनी लावलेली जुनी झाडे आहेत तसेच एक चिकुचे झाडसुद्धा आहे.पूर्वी रामफळ सुद्धा होती पण ती वादळात मोडली. पूर्वी आमच्या घराच्या खाली बारमाही पाण्याचा पाट वाहत असे आणि तेथे असणाऱ्या द्रोणी मध्ये बसून बाथटब प्रमाणे आंघोळ करणे म्हणजे सिनेमातील रईसजादा झाल्यासारखे वाटायचे. आता नळ पाणी योजना आल्यानंतर पाटाचे पाणी बंद झाले. पाटाच्या खालच्या बाजूला नारळी पोफळीची बाग होती, तिला सारणीने पाटाचे पाणी लावले होते. बाग संपली की नादि वाहते. तिचा प्रवाह माझ्या घराच्या पाठच्या दरवाज्यात उभे राहिले तरी दिसतो. एव्हडे सुंदर आहे आमचे पाठचे परसव. या भरगचच परसवामुळे विविधरंगाचे रंगी बे रंगी पक्षी, बुलबुल, मैना, पोपट, साळुंक्या आमच्या बागेला भेट देत आपल्या सुस्वर गायनाने आमची झोपमोड करतात. रंगीबेरंगी फुलपाखरे बघून मन हरखून जाते. देवाने तयार केलेला निसर्ग हे जगातील पहिले आश्चर्य आहे हेच आपल्याला मानावेच लागेल. उन्हाळ्यात आम्ही रात्री आमच्या गच्चीवर आकाशातीतील चांदण्या मोजत आणि पहाटेच्या गार वाऱ्याची झुळूक अंगावर घेत आणि पावसाळा जवळ आला की काजव्यांच्या मंद परंतु मधेच चमकणाऱ्या लख्ख प्रकाशात झोपतो. दिवसा पाठच्या अंगणात बसलो की एक खरकुंडीची जोडी आपसातच खोड्या करत खेळत असते. मध्येच एखादा सुतारपक्षी, बेलूर मधील चांन्नकेशव मंदिरातील दगडावर मूर्तिकाम करणाऱ्या कारागिरा प्रमाणे, आपली धारदार चोच कोणत्या तरी झाडावर तालात चालवत असतो, तर कोकिळा आपल्या मधुर गायनाने स्वर्गातील अप्सरांना सुद्धा नाचायला भाग पाडेल असे सुस्वरात गात असते. मध्येच एखादा ककणेर झपाझप पंखांचा आणि तोंडाने मोठा मधुर आवाज करत बघे बघे पर्यंत निघून जातो आणि मग लांब गेल्यावर दिसतो. दरवर्षी आम्ही गावाला आलो की आई चैत्रगौरीचे हळदीकुंकू सवडीनुसार मे महिन्यात करायची आणि त्याची सजावट करण्याचे काम आम्ही मुले करीत असू, मग रंगीबेरंगी फुले, हिरवी, पांढरी, गुलाबी, काळी करवंद आणि इतर झाडांचे डहाळे यांनी गौरीचे मखर सजवत असू. दुसऱ्यादिवशी आमच्याकडे सत्यनारायणाची पूजा असायची त्यावेळी पेट्रोमॅक्सच्या बत्तीच्या दिव्यात गावातील आमंत्रीत मंडळींच्या संगीत आरत्या रंगायच्या आणि मग सगळ्यांना आमरस पुरीचे जेवण. एक मेळावाच जणू. एक दिवस पाठच्या पडवीत पोहे कांडण्याचा कार्यक्रम होत असे. आदल्या दिवशी भिजवलेले भात दुसऱ्या दिवशी एका विशिष्ठ मडक्यात भाजून ते मग उखळीत कुटले जाई. आजूबाजूच्या बायका आईच्या मदतीला येत. आई मुंबईला जाताना कुळीथ पीठ, भाजणी पीठ, घावन पीठ येथूनच करून नेत असे. गावची प्रेक्षणीय स्थळे: या गावात काय नाही ते विचारा!! वीर मध्ये देवपाट आणि रानपाट असे दोन बारमाही धबधबे आहेत. रानपाट च्या धबधब्याला जायला रस्ता व्यवस्थित नाही पण देवपाटच्या धबधब्याला जायचे असेल तर आपल्याला पाटातून चालत जायला लागते. मी दरवर्षी एकदातरी त्या धबधब्याचे मनसोक्त दर्शन घेऊन येतो. याचे नेहमीच आश्चर्य वाटत आले आहे की फक्त 4 महिने पाऊस पडतो पण हे पाणी बारमाही कसे पडते आणि ते जर खडकात साठलेले असते तर ते एकदम कसे बाहेर पडत नाही? ऐन उन्हाळ्यात सुद्धा त्याची धार बऱ्यापैकी मोठी असते. असो, तर हे दोन्ही धबधबे एकत्र होऊन वर म्हटले तशी छोटीशी नदी माझ्या घराखालूनच वाहते. घराखाली नदीमध्ये कोकमाच्या झाडाखाली पाण्यात पायघालून, तरंगणाऱ्या पाणकोळ्यांची सतत चाललेली धडपड आणि रंगीबेरंगी माश्यांची कसरत बघता बघता वेळ कसा जातो ते कळत सुद्धा नाही. धबधब्यांच्या त्या अखंड प्रवाहांमुळे आणि पावसाच्या कृपेमुळे अगदी ऐन उन्हाळ्यात जरी आपण वीरला गेलात तरी लहानच काय पण एखाद्या मोठ्या वृक्षाची पाने सुद्धा तुम्हाला सुकलेली आढळणार नाहीत. सर्व कसे हिरवेगार. त्या हिरवळीत सुद्धा वेगवेगळ्या छटा आहेत बर का! कधी कोवळी पोपटी, तर कधी वृद्ध ठळक हिरवी तर कधी नववधू सारखी ताजीतवानी हिरवी, एक ना अनेक. कॅमेरा तरी किती छटा टिपणार बिच्चारा? वर देवपाट विभागात विष्णू अवतार असलेल्या श्री लक्ष्मी मल्लमर्दन देवतेचे भव्य देऊळ आहे. किशोरावस्थेत असताना श्रीकृष्ण आणि त्यांचे बंधू बलराम, हे कंस, कैट्भ, चाणूर इत्यादी ८ मल्लांचा वध करत आहेत असे दृश्य असलेली ती सुमारे ७०० वर्षा पूर्वीची ६ फूट उंच आणि ४.५ फूट रुंद अशी भव्य पाषाण मूर्ती आहे. वर लक्ष्मी विष्णू असलेली महिरप आणि खाली हा मल्लमर्दन अशी ती मूर्ती आहे. नुकताच या मूर्तीवर वज्र्यलेप केला गेला आहे. दरवर्षी कार्तिक शुद्ध एकादशीला येथे २ दिवसाचा कार्तिकोत्सव अतिशय उत्साहात साजरा होतो. देवपाट मध्ये मुख्य गावकीचे रत्नेश्वराचे प्राचीन देऊळ आहे. रत्नेश्वर च्या देवळात रत्नेश्वर सोडून सोमेश्वर, केदार, वर्धन, वाघजाई, नवलाई, मानाई इत्यादी ग्रामदेवतांच्या मुर्ती आहेत. ग्रामदेवतेचे पुजारी गुरव आहेत. परंपरेने गावात दोन पालख्या आणि दोन होळया असतात. गावकीच्या देवळात पूर्वीपासून पूर्वसत्ता आणि राजसत्ता असे काम करण्याचे मान असतात. १३ व्या शतकात हा सर्व कोकण प्रांत विजयनगर साम्राज्याचा भाग होता. त्या काळात राजाचे प्रतिनिधी म्हणून काही ब्राह्मण मंडळी या गावात खोत म्हणून महसूलवसुली च्या उदेशाने येथे स्थायिक झाली. या देवळात राजसत्ता म्हणून त्यांना सुद्धा मान असायचा परंतु कूळ कायद्यांमध्ये खोतकि गेल्याने आता नवीन पिढी तो मान मनापासून राखायला तयार नाही. चौसोपी विभागात श्री भगवती देवीचे खाजगी देऊळ आहे. येथे नवरात्रात मोठ्या प्रमाणात पूजा विधी होतात. असे म्हणतात की जावळीच्या चंद्रराव मोरे यांचे ब्राह्मण कारभारी मोऱ्यांची देवी सांभाळायला घेऊन वीर येथे आले ती ही देवी. काही काळ मोऱ्यांच्या वंशजाने सुद्धा येथे वास्तव्य केले होते अशी आख्यायिका आहे. पण याबद्दल कोणतेही पुरावे उपलब्ध नाहीत. खाली गावाच्या दुसऱ्या टोकाला वीर बंदर येथे कापशी नदी जयगड खाडीला मिळण्यासाठी आमच्या गावकडूनच जाते तिचे पाणी पावसाळ्यात आणि काही काळ हिवाळ्यात गोड असते एरवी खारट असते. कधी बंदरावर गेलो तर घरातील आणि आजूबाजूच्या चार कच्चा बच्चाना बरोबर घेऊन जाताना घरून भेळ घेऊन जातो आणि आमच्या जितू भोईला सांगून खाडीचा एक फेरफटका त्याच्या होडीतून फिरवून आणतो. ती जी भेळेची मजा वीर बंदरात आहे ती अगदी चौपाटीवर खाल्लेल्या भेळेत सुद्धा वाटत नाही. कोकणातील भुते, खेते आणि अंधश्रद्धा: कोकणात मालक, भुते, मांत्रिक आणि गुरव ह्या गोष्टी अजूनही फार चालतात. त्यापायी अनेक लोक आर्थिक दृष्ट्या धुपले आहेत पण सुधारणा नाही. आमच्या विभागात वायंगं भूत फार प्रसिद्ध आहे. अनेक लोकांची समजूत आहे की हे वायंगं भूत म्हणजे अल्लाउद्दीन जादूचा दिवा आहे. त्या वायंगं भुताला खुश ठेवा आणि आपल्याला वाटेल ते चांगले वाईट काम त्याच्याकडून करवून घ्या असा एक समज आहे. गावातील काही मंडळी अजूनही अशा प्रकारच्या विचाराने मागासलेलीच आहेत. जरा माणूस जास्त आजारी झाला की पहिले मांत्रिक आणि नंतर डॉक्टर ही ह्यांची परिस्थिती. तुम्ही कितीही समजवा ते वागायचे तसेच वागणार. वर्षाची कमाई 8 दिवसात मांत्रिकाच्या बोडक्यावर घालून परत लोकांकडे कर्ज मागायला मोकळे. त्यासाठी परत वाडीवाडीचे फंड, भिश्या जास्त व्याजाने पैसे ध्यायला तयार आहेत. यामध्ये बिना कागदपत्रे पटकन निधी मिळतो आणि जिथपर्यंत परतफेड पूर्ण होत नाही तेथपर्यंत चक्रवाढ चालूच. त्यामुळे कोकणी माणसाने कितीही कमावले तरी त्याची प्रगती होताना दिसत नाही. भावकी मात्र कायम उपयोगी असते पण या बाबतीत कोण कोणाला समजवायला जात नाही गावाची प्रगती: गाव जरी एकच असला तरी त्याचे महसूल दृष्ट्या देवपाट आणि वीर असे दोन विभाग आहेत. गावात एकंदर १६ वाड्या आहेत. दहावी पर्यंत एक इंग्रजी हायस्कुल आणि जिल्हा परिषदेच्या ३ मुख्य शाळा ७ वि पर्यंत शिक्षण देत आहेत. शिवाय वाडीवाडीत बालवाड्या सुद्धा आहेत. शिक्षणाच्या दृष्टीने हे गाव फार पूर्वी पासून पुढारलेले असून आमच्या गावातील पहिल्या जिल्हा परिषदेच्या शाळेला कमीतकमी १४० वर्ष होऊन गेली आहेत. मी अभिमानाने सांगू शकतो की महाराष्ट्रातील पहिल्या मराठी इंग्रजी डिक्शनरी चे प्रवर्तक लेखक कै. कृष्णाजी भास्कर वीरकर हे याच गावातील विद्यार्थी ज्यांनी पुढे पुणे येथे आदर्श शिक्षण मंडळी ही संस्था स्थापन करून पुण्यात ६ शाळा आणि एक शिक्षक ट्रेनिंग कॉलेज काढले. १९६८ साली गावातून पहिला राज्य शासनाचा रस्ता वाहतुकीला खुला झाला आणि चिपळूण वीर अशी राज्य परिवहन मंडळाची बस सुरू झाली. गावात छोटे वाचनालय सुद्धा आहे पण अजून त्याची म्हणावी तेव्हडी गोडी मुलांना लागलेली नाही. सध्य स्थिती: आता आम्ही जातो ते एका वेगळ्याच वीर मध्ये. आता आमचे कौलारू घर जाऊन आम्ही कुटुंबीयांनी एक स्लॅबचे नवीन घर बांधले आहे. आमच्या ब्राह्मण आळीत आता मोजकीच घरे उघडी आहेत. बाकीची घरे एकतर बंद असतात किंवा मोडकळीस आलेली आहेत. गावात पाणी, रस्ता, वीज, गॅस कनेक्शन या सुविधा आहेत, एवढेच काय घरात जीओ चा मोबाईल सुद्धा लागतो. दिवसातून 2 वेळा जायला आणि 2 वेळा यायला चिपळूण पर्यंत राज्य परिवहन मंडळाच्या बसेस आहेत. पाण्याचे पाट जाऊन धबधब्यावर छोटी धरणे बांधून नळाने पाणी सर्व वाडी वस्तीवर घराघरात फिरवले गेले आहे. सर्व सुखसोयी उपलब्ध आहेत. गावात इतर समाजाची केम्बळारू घरे जाऊन आता फाडीची पक्की आणि वर पत्रे अशी टुमदार ऐसपैस घरे आहेत. त्यांच्याकडे सुद्धा काही घरांमध्ये एक दोन म्हातारा म्हातारी रहातात बाकी सर्व तरुण मंडळी पुण्या मुंबईत कामाला जातात. पूर्वी आमच्याकडे प्लम्बर आणि रंगकाम करणारी खूप लोक होती पण आता नवीन मुले त्या लाईनमध्ये जात नाहीत. थोडीफार मुले १० वि च्या पुढे शिकली आहेत पण बाकी जे मिळेल ते काम करून शहरात पोट भरत आहेत. आर्थिक सुधारणा थोडी फार आहे. गावात हमखास रोजगार नसल्यामुळे ही परिस्थिती आहे. जिथपर्यंत स्थानिक रोजगार संधी उपलब्ध होत नाहीत तेथपर्यंत हे असेच चालू रहाणार असे दिसते. खरे म्हणजे फूड प्रोसेसिंग आणि ऍग्रीकल्चर प्रोसेसिंग किंवा लघु उद्योगासाठी खूप मोठा वाव आहे पण त्यासाठी लागणारे नेतृत्व नाही आणि आहे ते पक्षीय आणि जातीय राजकारणात आनंद मानत हात चोळत बसले आहेत. शेतीची सध्य स्थिती: शेतमजूर परवडत नाहीत आणि शेतीला घरची माणसे नसल्यामुळे शेतीचे प्रमाण कमी झाले आहे. त्यात सरकारी स्वस्त धान्य मिळते म्हणून कोणी शेती करण्यात रस घेत नाही. आंबा आणि काजू लागवड खूप झाली आहे पण आंब्याच्या बे भरवशी उत्पन्नामुळे खर्च आणि उत्पन्नाचा ताळमेळ बसत नाही. जुन्या मोठ्या आंब्याच्या झाडावर चढायला गडी मिळत नाही. नारळाच्या आणि पोफळीच्या झाडावर चढणारे तयार गडी मिळत नाहीत त्यामुळे बागायतदार अडचणीत आहेत. मिळतात त्यांची जास्त रोजाची मागणी जास्त असते. त्यात डोंगरळविभाग असल्यामुळे मोठमोठे वांनर, लाल तोंडाची माकडे आणि लहान केलटी यांची खूप पैदास आहे ते खूप हैदोस घालतात. कितीही पाळत ठेवा, तुमच्या चुलीवरील भाकरी कधी पळवून नेतील ते तुम्हाला कळणार सुद्धा नाही. दरातील भाजीपालाच काय पण फुलझाडांचा पाला सुद्धा ओरबाडून खातात. तयार होत आलेल्या भाताच्या लोम्ब्या सुद्धा खातात, नाहीतर डुकरे येऊन खातात.त्यामुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे. या बाबतीत सरकारी दरबारी तक्रारी होऊन सुद्धा काही उपाययोजना होताना दिसत नाहीत. आपले गाव म्हणून एका बाजूला प्रगती झाल्यासारखे वाटते पण गावात माणसे कमी झाली आणि तरुण मंडळी कमी झाल्याने हे पुढे कसे चालणार हा प्रश्न पडतो. गाव म्हातारे होऊ लागले आहे असे वाटते. परतीचा प्रवास: पूर्वी गावातून मुंबईला निघताना परतीच्या वाटेवर जाताना अनेक घरांमध्ये हाक मारून निरोप घेवुन यावे लागत असे. आबालवृद्ध मंडळींचे आणि आमचे सुद्धा डोळे पाणावलेले असायचे. कारण त्याकाळी पत्राशिवाय सम्पर्क साधन नसायचे. यावर्षी ते त्यावर्षी भेट व्हायची. त्यामुळे खूप दूर गेल्यासारखे वाटायचे. आम्हाला आमच्या काकूचे फार वाईट वाटायचे कारण ती बिच्चारी वर्षभर गावात एकटी रहायची. पण आमच्या मुंबईच्या गिरगावातील छोट्याश्या खोलीत तिला करमत नसे. तिने तिच्या दुधपाण्यासाठी एक म्हैस आणि रेडकू बाळगले होते. बाल विधवा असल्यामुळे बिचारीला असे जीवन जगणे क्रमप्राप्त होते. माझे वडील सर्व आर्थिक मदत करीत असत पण एकटेपणाला काय उपाय? त्यामुळे हे 2 महिने तिचे चांगले जात असत. ती आम्हाला परतीला सोडायला यायची त्यावेळी खूप रडायची पण मग दर महिन्याला एक पत्र पाठवू या अश्वासनाने सांगता व्हायची. बाकीच्या घरातील माणसे सुद्धा त्या वेगळ्या सोहोळ्यात सामील व्हायची. आता काकू नाही ती १९७० साली निर्वतली. आता लोक गाडी घेऊन जातात, गाडी घेऊन येतात कोणाला कळत सुद्धा नाही. जो तो आपापले बघतो. मी मात्र आमच्या शेजाऱ्यांना आमच्या घरावर लक्ष ठेवा असे सांगून येतो. असो असे हे स्वर्ग सुख आम्हाला दुसरीकडे कुठे मिळणार? हॉटेलात गेलो की दिवसाचा चार्ज लागू. त्यावेळी नेहमी आठवण येते ती "राजास ज्या महाली, सौख्ये जरी मिळाली, ती सर्व प्राप्त झाली या झोपडीत माझ्या" ह्या कवितेची. वडिलांनी सांगून ठेवले आहे, आपण एव्हडी जागा दुसरीकडे विकत घ्यायला गेलो तर ती आपल्याला परवडणार नाही आणि परवडली तरी ती आपल्याला परकीच वाटणार कारण या गावात आपले वर्षानुवर्षे ऋणानुबंध आहेत. त्यापेक्षा आहे ती वाडवडिलांची इस्टेट सांभाळून ठेवा. त्यातच तुम्हाला सुख आहे आणि पूर्वजांचे आशिर्वाद. ते करण्यात अजून तरी कंटाळा आलेला नाही. असे हे आमचे वीर गाव. कधी संधी मिळाली तर वेळातवेळ काढून कार्तिकी उत्सवाला जरूर या म्हणजे तुमची सर्व सोय होऊ शकते. माधव भोळे व्हाट्सप 9819479791 ईमेल : madhavbhole99@gmail.com

Friday, July 1, 2022

वीर येथील श्री लक्ष्मी मल्लमर्दन अर्चाविधी उत्सव मे 2022.

वीर येथील श्री लक्ष्मी मल्लमर्दन अर्चाविधी उत्सव मे 2022. 2019 साली कार्तिकी उत्सवात ठरल्याप्रमाणे, करोना काळानंतर, वीर येथील श्री लक्ष्मी मल्लमर्दनाच्या मूर्तीची देवत्तत्वे दिनांक 18 नोव्हेंबर 2021 रोजी विधिवत उतरवून दि. 7 जानेवारी 22 रोजी मूर्तीच्या वज्रलेप प्रक्रियेला प्रत्यक्ष सुरुवात झाली ती दि. 14 मार्च 22 रोजी पूर्ण झाली. दिनांक 21 आणि 22 मे 2022 रोजी झालेल्या अर्चाविधी उत्सव सोहळ्यासाठी साधारणपणे 15 दिवस आधी वीर येथे प्रत्यक्ष तयारीला सुरवात झाली. मंदिर आवारातील पेव्हर ब्लॉक साफ करणे, गाभाऱ्यात श्रीगणपतीची नवीन पंचधातूंची मूर्ती आणि श्री शंकराची पिंडी बसविणे, सम्पूर्ण गाभारा, मंदिर साफ करून धुवून काढणे, देवापुढे केळीचे मखर व तोरण बांधणे, जेवणाची भांडी धुवून वाळत टाकणे, स्वछता गृहाची दुरुस्ती, पाण्याची व्यवस्था, मंदिरात कापडी छत बांधणे, मंडप डेकोरेशन वगैरे. दि. 18 मे पर्यंत यातील बहुतेक कामे पूर्ण झाली होती आणि मंडप डेकोरेशनचे काम सुरू होते. दिनांक 19 मे रोजी अचानक रात्रभर जोरात पाऊस पडला आणि मंडपात लावलेल्या ताडपत्रीवर पाणी साचून पाण्याच्या वजनाने मंडपाचा काही भाग कोसळला. त्यामुळे दिनांक 21 / 22 मे रोजीच्या उत्सवातील अडचणींबद्दल धाकधूक निर्माण झाली. दिनांक 20 मे रोजी संध्याकाळी 5 वाजता गावातील वंत प्रमुख सर्वश्री योगेश वीरकर ( चौथाई वंत), दीपक वीरकर ( केशववंत), सीताराम वीरकर, प्रकाश वीरकर, महादेव हरी वीरकर ( यशवंत वंत), संजय भोळे ( नवेलेवंत तर्फे), श्रीराम आणि सुयोग वीरकर ( चौसोपी वंत) यांनी श्री. श्रीकृष्ण वीरकर, ध्रुव भोळे आणि राम भोळे यांच्या मार्गदर्शनाखाली श्री लक्ष्मी मल्लमर्दन देवतेला श्रीफळ ठेवून प्रार्थना करून दि. 21 पासून सुरू होणारे अर्चाविधी कार्य निर्विघ्न पणे पार पाडण्यासाठी श्रीलक्ष्मी मल्लमर्दन देवतेला प्प्रार्थना करण्यात आली. त्यानंतर मंदिराच्या घुमटाच्या दुरूस्तीमुळे दूषित झालेल्या वास्तूच्या शुद्धीकरणासाठी सर्वश्री श्रीकृष्ण वीरकर, ध्रुव भोळे, राम भोळे, सुयोग पटवर्धन आणि वैभव पटवर्धन यांचे हस्ते उदक शांती विधी करण्यात आला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे 21 मे रोजी सकाळी कामाला लवकर सुरवात करता यावी म्हणून आदल्यादिवशी ( 20 मे ला) यजमान सौ. व श्री. योगेश वीरकर यांच्या हस्ते पुण्याहवाचन करण्यात आले तसेच अर्चा विधीला लागणारी सम्पूर्ण मांडणी करण्यात आली. देऊळ तिनही बाजूने उघडे असल्यामुळे रात्री श्रीकृष्ण वीरकर, दीपक वीरकर, ध्रुव भोळे, सुरेश बागवे यांनी जागता पहारा ठेवला. प्रत्यक्ष विधीला दि. 21 मे ला सकाळी ठीक 8 वाजता सुरवात झाली. यजमान श्री. योगेश वीरकर सपत्नी हजर होते. तेथून पुढील धार्मिक विधी सुरू झाले. श्री. श्रीकृष्ण वीरकर यांच्याबरोबर वेदमूर्ती श्री. विलास भोळे, श्री. ध्रुव भोळे, श्री. प्रमोद भोळे, श्री. रामचंद्र भोळे, श्री. अमेय भोळे, श्री. संजय भोळे, श्री. दीपक जोशी ( वाघांबे), श्री. मालशे ( वहाळ), श्री. वैभव पटवर्धन ( पेढे परशुराम), श्री. सुयोग पटवर्धन (पेढे परशुराम) अशी वेदशास्त्र सम्पन्न मंडळी अर्चा विधी साठी नियोजीत केली होती. विशेष म्हणजे यातील बरीच मंडळी तरुण होती. त्यांनी तीन पर्यायाने अर्चा केली. दि. 21 रोजी पहिल्या दिवशी दोन पर्यायांचे हवन होऊन देवाला निद्रिस्त ( जलाधीवास) करण्यात आले. त्यानंतर उपस्थितांना दुपारी 2 वाजता भोजन देण्यात आले. मूर्तीचे कारागीर श्री. दीपक ओतारी व त्यांचे सुपुत्र या उभयतांचा शाल आणि श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला तसेच मंदिराचे पुजारी श्री. श्रीकृष्ण वीरकर यांच्या आजवरच्या निरलस सेवेबद्दल त्यांचाही सत्कार करण्यात आला. दि. 21 मे रोजी सुमारे 350 ते 400 मंडळी वीर इथे प्रत्यक्ष उपस्थित होते. अनेकांना यायची इच्छा होती परंतु मे महिन्यामुळे रेल्वे तिकिटे उपलब्ध न झाल्याने अनेक मंडळींनी उपस्थित राहण्यास असमर्थता दर्शवली. वीर गांवातील माहेरवाशिणी, ग्रामस्थ त्यांचे नातेवाईक एवढेच नव्हे तर ज्यांचा कधी काळी वीर गांवाशी संबंध आला होता अशी सर्व मंडळी हौशीने या सोहळ्याला हजर होती. भक्तांची हौस म्हणून रात्री आरत्या आणि मंदिराभोवती 4 भोवत्यांचा अत्यंत उत्साहात व बहारदार कार्यक्रम झाला. आरती करण्यापूर्वी मंडळांचे अध्यक्ष श्री. सीताराम वीरकर, श्री. श्रीकृष्ण वीरकर आणि इतर कार्यकारिणी सदस्य यांचे हस्ते या उत्सवानिमित्त प्रकाशित केलेल्या स्मरणिकेचे उद्घाटन करण्यात आले. रात्रीचे भोजन झाल्यानंतर रत्नागिरी मधील सुप्रसिद्ध गायक मंडळी सर्वश्री विशारद गुरव, चिपळूण ( संवादिनी आणि गायन), विपुल निमकर, चिंद्रवळे ( गायन ), वीरेंद्र जोशी, वाघांबे ( पखवाज ), प्रथमेश शहाणे ( तबला ), यांच्या सुमधुर आणि दर्जेदार गायनाने सम्पूर्ण परिसर भारावून गेला होता. दुसऱ्या दिवशी 22 तारखेला सकाळी ठीक 8 वाजता धार्मिक विधीला सुरुवात होऊन जलाधीवासातील निद्रिस्त देवतांना मंत्रजागरानी जागे करण्यात आले. त्यानंतर विधीवत पूजा होऊन पुढील सर्व प्रक्रियेला पूर्णाहुतीने समाप्त करण्यात आले आणि देवांच्या मूर्तीची पुनर्प्राणप्रतिष्ठा झाल्याचे घोषित करण्यात येऊन ही मूर्ती उपस्थितांना दर्शनासाठी खुली करण्यात आली. दुपारी महाप्रसादाचे भोजन झाले ( यासाठी सर्वश्री मदन, मोहन, प्रवीण चंद्रकांत वीरकर, विलेपार्ले या बंधूंनी विशेष प्रायोजकत्व केले.) यानंतर स्मरणिका आणि प्रसाद घेऊन मंडळी आपापल्या घरी परतायला सुरवात झाली. रात्री मंदिरात आरत्या आणि मंत्रपुष्पांजली आणि भोजन होऊन दोन दिवस मोठया उत्साहात सुरु झालेल्या अर्चा विधी सोहळ्याची सांगता झाली. माधव भोळे
श्री लक्ष्मी मल्लमर्दन प्रासादिक मंडळ आणि उत्सव मंडळातर्फे.

Thursday, June 30, 2022

वीर गाव - रम्य त्या आठवणी (९)

वीर गाव - रम्य त्या आठवणी (९) आज मी लिहिणार आहे ते जवळजवळ 45 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. आमच्या वीर गावा समोर खडपे काजुर्ली गाव आहे. खडपे काजूर्ली गाव हे दोन गावांचे मिळून बनले आहे. खडपे आणि काजूर्ली. पैकी काजूर्ली गाव वीर गावच्या बरोबर समोर येते आणि खडपे गाव हें पिलवली गावाच्या समोर येते. वीर आणि काजूर्ली यांच्या मधून कापशी नदी वाहते, ती पुढे भातगाव येथे तिसंग ला मिळते. तिसंग म्हणजे तिहेरी संगम. माखजन वरून येणारी शास्त्री नदी जी पुढे संगमेश्वर तालुक्यात वहाते ती तिसंग येथे मिळते, अबलोली येथून कापशी नदी येते ती खडपे काजूर्ली भातगाव करत तिसंग येथे मिळते आणि जयगड वरून येणारी जयगड खाडी तिसंग येथे मिळते म्हणून याला भातगाव तिसंग असे म्हणतात. तेथे पाणी फारच खोल आहे. खडपे येथे आमचे एक नातेवाईक कै. विठ्ठलराव पुरुषोत्तम जोशी रहात असत. ते माझ्या वडिलांचे मामे भाऊ. हे विठ्ठल राव मोठे हिकमती व्यक्ती. पूर्वी ह्या जोशी मंडळीपैकी काही मंडळी बडोदा, गुजरात येथे राहत आणि काही मंडळी खडपे येथे राहत. विठ्ठलराव त्याकाळी बी ए पास झाले होते. बडोदा येथे त्यांचे कसलेसे दुकान होते. परंतु आपल्या वडिलांच्या पश्चात गावची शेती आणि भिक्षुकी सांभाळण्यासाठी ते बडोदा सोडून खडपे येथे राहायला आले. त्यांच्या पत्नी कै वत्सलबाई या सुद्धा माझ्या दुसरीकडून नातेवाईक होत्या, त्या माझ्या लांबच्या चुलत भगिनी. त्यामुळे वीर येथे मुक्कामाला आलो की एक दिवस खडपे ट्रिप असायचीच. तेथिल वातावरण बघून आनंद वाटायचा. विठ्ठलरावाना शेतीची खूप आवड. त्यांची कैक एकर शेती दोन्ही गावात पसरली होती. पुरोहित असल्यामुळे गावात दरारा होता. गडी माणूस स्वतःहून त्यांना भेटायला येत असत. घरासमोरच कापशी नदी असल्यामुळे उन्हाळा सोडला तर बाकी महिने नदीला पाणी गोड असायचे. विठ्ठलरावानी घराजवळ मळ्यातच अननस, भुईमूग, ऊस, दोडकी, पडवळ सारख्या फळभाज्या यांची लागवड केली होती. त्यांना घरी लागणारे गोडेतेल स्वतःच्या भुईमुगाच्या पासून बनवायचे. शेतीला पूर्वी उंडी ने पाणी दिले जायचे.( उंडी म्हणजे नदीतून उपसा करून शेतात पाणी ओतण्यासाठी तयार केलेली एक तरफच). विठ्ठठराव अत्यंत हौशी आणि दिलदार माणूस. ते आमचे पुरोहित सुद्धा होते. पूर्वी यजमान उपाध्ये या नात्याला लोक फार मान देत. एक वर्षी मी खडपे येथे जाण्याचा बेत आखला. त्यावेळी मी नुकताच कॉलेजला गेलो होतो. आमच्या शेजारचा सुरेश सुद्धा खडपे येथे यायला उत्सुक होता. वत्सलबाई त्याच्या मावशी लागत. वीर ते खडपे चालत अंतर 1 तास म्हणजे साधारण 7 किलोमीटर असेल. आदल्यादिवशी घरच्यांना सांगून दुसऱ्यादिवशी सकाळी लवकर उठून मी आणि सुरेश मार्गस्थ झालो. रस्ता खाडीमार्गे असल्याने तेथे गेल्यावरच आंघोळ करणार होतो. प्रथम वीर ब्राह्मणवाडी ते जावलेवाडी कातळ असा डोंगराळ भाग चढलो. त्याकाळी जावले वाडीतील बहुतेक घरे केम्बळारु आणि दगडमातीच्या भिंतींनी बनवलेली होती. (केम्बळारू म्हणजे गवताने शाकारलेली. आता प्रत्येक घर चिरेबंदी आणि वर पत्राच्या झाली आहेत. घरकुल योजनेची आणि शेतकऱ्यांच्या कष्टाची कृपा). पुढे कातळावरून चालत डाव्याबाजूला शेमखडी चे पाणी लागते तेथे डोंगर उतरायला सुरुवात केली. शेमखडी म्हणजे तेथे कातळात झऱ्यातून पाणी येते. गरीब कुणबी मंडळी त्या डोंगराळ भागात राहत त्यांना ते पाणी पिण्यासाठी उपयोगी येई. गरिबी इतकी होती की नारळाच्या करवंटी ने अल्युमिनियम चे किंवा मातीचे हांडे भरले जात होते. तेथील थंडगार पाणी प्यालो. ( आज त्या भागात राष्ट्रीय नळपाणी योजना येऊन रानपाट मधील धरणाचे पाणी पाईप ने त्यांच्या घरी आले आहे. त्याआधी विहीर योजने अंतर्गत तेथे कातळामध्ये भलीमोठी विहीर खणून ते पाणी टाकीमार्गे सर्वांना नंबर लावून मिळतं असे). पुढे शेमखडीचा डोंगर उतरून आम्ही वीरच्या मळ्यात आलो. तेथे वीर पिलवली सीमेवर एक छोटेसे झोपडे होते तेथे एक वृद्ध बाई एकटीच राहत असे, ती झोपडी पार करून साधारण 1 मैल दीड मैल चालत पिलवली च्या ब्राह्मण वाडीजवळ आलो. पिलवलीच्या ब्राह्मणवाडीच्या बरोबर समोर ह्या विठ्ठल रावांचे घर आहे. मध्ये खाडी आहे. पिलवलीच्या ब्राह्मण वाडीतील कांतूच्या घरासमोर उभे राहून हाक मारली की खडपेकरमंडळी उत्तर देतात. त्याप्रमाणे त्यांना दोन तीन हाका मारल्या आणि विठ्ठल रावांचा पुतण्या माधव जोशी समोर आला. त्याने आम्हाला ओळखले. त्यावेळी खाडीला पार नव्हता.( पार म्हणजे जशी समुद्रात भरती आणि ओहोटी दिवसातून प्रत्येकी दोन वेळा येते तशी खाडीला अनुक्रमे पाणी जास्त कमी होते. पाणी कमी झाले की पार पडला असे म्हणतात.). त्यामुळे खाडीच्या पाण्यातून पलीकडे जाणे क्रमप्राप्त होते. माधव जोशी नेहमीप्रमाणे हाफ पॅन्ट वरच असल्याने तो पटकन पाण्यात उतरला आणि पोहत पलीकडे पिलवली मध्ये आम्ही उभे होतो तेथे आला. माधव तब्येतीने दणकट होता. त्याने मला पटकन खांद्यावर घेतले आणि जिथपर्यंत पाणी कमी होते तेथपर्यंत नेऊन सोडले आणि म्हणाला आता इथून चालत जा पलिकडे. खाडी असल्यामुळे चपला हातात होत्या. खाडीचा अंदाज नव्हता. खाडी मध्ये अनेक ठिकाणी कालवे असतात हे माहिती नव्हते. ( कालवे म्हणजे एक प्रकारचे पाण्यातील प्राणी जे दगडाला शिंपल्यासारखे घरे बांधून त्यात राहतात. या शिपल्याना धार असते.) नेमके कालव्यावर पाय पडल्यामुळे पायाला भेगा पडल्या. बाहेर आलो तर पायातून रक्त येत होते. थोड्या वेळाने माधव आमचे सामान आणि सुरेशला घेऊन घरी आला. सुरेश तब्येतीने मजबूत असल्याने माधवने त्याला खांद्यावर न घेता हाताला धरून पाण्यातून पोहोत पलीकडे आणले. माधवने माझ्या कापलेल्या पायांवर कोकमाचे तेल दिव्यावर गरम करून लावले. ( कोकमाचे तेल एरवी ते घट्ट लोण्याच्या गोळ्यासारखे असते). खडपे येथे घरी गेल्यावर वत्सलबाई नि आम्हाला मऊ भात मेतकूट ची न्याहारी दिली आणि आम्ही अंघोळ करून स्थिरावलो. सुरेशला गप्प बसवत नव्हते. त्यानी बघितले की मळ्यात अननस, भुईमूग, ऊस सारखे त्याच्या आवडीचे पदार्थ आहेत. त्याने प्रथम एक अख्खा अननस फस्त केला. नंतर बचकभर शेंगदाणे खाल्ले तेव्हड्यात वत्सलबाई नि आपल्या गड्या करवि सांजण करण्यासाठी बरका फणस झाडावरून काढुन घेतला एक छोटा आणि एक मोठा. त्यातील एक अख्खा बरका फणस त्याने मावशीच्या नकळत कधी फस्त केला ते मला कळलेच नाही. तेथपर्यंत दुपारचा एक वाजला होता. नेहमीप्रमाणे विठ्ठलराव आपले पौरोहित्य आवरून घरी आले होते. दुपारी दीड वाजेपर्यंत वैश्वदेव आणि देवाला नैवेद्य दाखवून दुपारचे सागर संगीत भोजन झाले. संध्याकाळी आम्ही परत मळ्यात गेलो होतो. सुरेशने परत सकाळचाच दिनक्रम केला. भुईमुगावर यथेच्छ ताव मारला आणि वर अख्खा अननस पोटात गेला. रात्री दिवे लागणिच्या वेळी मी पुढिल दारी असताना अचानक माधव, माधव अशी हाक ऐकू आली. बघतो तर सुरेश पोट धरून ओरडत होता. मी त्याला विचारले काय झाले तर म्हणाला पोट दुखत आहे, कळा येत आहेत. त्याने मला पोटाला तेल लावून देण्याची विनंती केली. ती माझ्या आयुष्यातील पहिली सुश्रुशेची संधी. मला शक्य होईल तेव्हडे केले. मावशीने त्याला ओवा आणि गरम पाणी दिले. रात्रभर सुरेश विव्हळत होता. त्या खेडेगावात त्याकाळी कुठला डॉक्टर? . रात्री बारा साडेबाराला सुरेशला खूप उलट्या झाल्या. त्यात त्याची सहनशक्ती थोडी कमीच. जरा दुखले की बोंब मारायचा. सकाळी उठल्यावर सुरेशने हट्टच धरला माधव तू मला उचलून वीरला घेऊन चल. सुरेश चा देह माझ्या दुप्पट आणि मी बारीक. त्यात 7 / 8 किमी कोणाला खांद्यांवर घेऊन जाणे मस्करी आहे का? मला वाटले कुठून बुद्धी झाली आणि खडप्याला आलो. मी त्याला कसेबसे समजावले. म्हटले आजचा दिवस काढ आणि पूर्ण लंघन कर. पण तो कसला तरी थोडे जेवलाच. संध्याकाळी 4 वाजता त्याला बरे वाटले आणि आम्ही खडप्यावरून परतीचा प्रवास सुरु केला. सुरेशला चालण्याशिवाय पर्याय नव्हता. 6 वाजेपर्यंत आम्ही वीर ब्राह्मणवाडी मध्ये आलो. सुरेशला त्याच्या आईच्या ताब्यात दिला आणि हुश्श केले. त्याकाळी खाडीमार्गे सुद्धा वीर बंदर पर्यंत यायला होड्या होत्या परंतु परत वीर बंदरातून 2 ते 2.5 किमी चालू तेव्हा कुठे ब्राह्मण वाडी येते म्हणून सर्व लोक डोंगर मार्गानेच येत असत. आता वीर ते खडपे जायचे झाल्यास हे पहिले मार्ग आहेतच शिवाय वीर-वहाळ-आबीटगाव-मूर्तवडा-अबलोली-खडपे असा रस्ता मार्ग आहे आणि विठ्ठल रावाच्या दरवाजात गाडी जाते. आता विठ्ठल राव, वत्सलाबाई यातील कोणीही हयात नाहीत. त्यावेळी माणसे गरीब पण मनाने श्रीमंत होती. सध्या तेथे विठ्ठलरांवांचे चिरंजीव डॉ आनंद जोशी राहतात. माधव भोळे

Tuesday, April 27, 2021

श्री लक्ष्मी मल्लमर्दन देवस्थान, वीर

                 


         श्री लक्ष्मी मल्लमर्दन देवस्थानवीर

(देवस्थान पत्ता: श्री लक्ष्मी मल्लमर्दन मंदिरवीर, तालुका चिपळूणजि.रत्नागिरीमहाराष्ट्र, पिन कोड: ४१५ ६४१)

सम्पर्क: श्री माधव गणेश भोळे, सचिव श्री लक्ष्मी मल्लमर्दन प्रासादिक मंडळ; मालाड(पश्चिम), मुंबई ४०० ०६४.  मोबा: ९८१९४ ७९७९१ किंवा  श्री श्रीकृष्ण वसंत वीरकर, अध्यक्ष,  श्री लक्ष्मी मल्लमर्दन प्रासादिक उत्सव मंडळ, मु. पो. वीर, व्हाया पोस्ट निवळी, तालुका चिपळूण, जिल्हा रत्नागिरी, पिन कोड ४१५ ६४१ (मोबा: ९४२०० ३३२०७ / ७३५०३ ४८४२९

 

मुंबई गोवा महामार्गावर चिपळूण पासून पुढे २० किलोमीटर अंतरावर सावर्डे येथून उजव्या बाजूला एक वहाळ फाटा नावाचा रस्ता जातो. सावर्डे पासून  २४ किलोमीटर आत गेले कि एक अतिशय सुंदर, वनश्रीने नटलेले असे वीर गाव आहे. गावाला दोन्ही बाजूनी डोंगर असून तेथे बारमाही दोन धबधबे आहेत. एका धबधब्याचे नाव देवपाटचा धबधबा तर दुसऱ्याचे नाव रानपाटचा धबधबा आहे. गावाच्या दुसऱ्या टोकाला खाडी किनारा आहे, तेथे कापसी नदी जयगड खाडीला मिळते.  देवपाट येथील धबधब्याजवळच तेथील ग्रामदैवत "श्री लक्ष्मी मल्लमर्दन" देवतेचे एक भव्य देऊळ आहे. मंदिरात "श्री लक्ष्मी मल्लमर्दन" देवतेची   फूट उंच, . फूट रुंद आणि इंच जाडीची  पाषाणाची प्राचीन सुंदर मूर्ती  आहे.

गावातील एक प्रमुख सदस्य कै. रामकृष्ण विठल वीरकर (डॉ. हरिभाऊयांचे पूर्वजांना सुमारे २०० ते २५० वर्षांपूर्वी हि मूर्ती  गावाजवळील खाडीत जुवे बेटावर सापडली अशी आख्यायिका आहे तज्ज्ञांच्या मते  ही मूर्ती आठव्या शतकातली म्हणजे सुमारे १२०० वर्षांपूर्वी कोरलेली असावी.  संपूर्ण मूर्ती पाषाणाची असून  भागांमध्ये विभागली गेली आहे ( बैठकमहिरप,  खांब आणि मुख्य मूर्ती). 

मुख्य मूर्ती श्री विष्णूचे अवतार,  भगवान श्रीकृष्ण  किशोरवयीन होते त्यावेळी  त्यांनी आणि त्याचे बंधू बलराम या दोघांनी मिळून मल्ल  ( मथुरेचा राजा कंस, त्याचे पहेलवान शल, तोशल, कुट, चाणूरमुष्टिक इत्यादी   मल्ल ) कुस्तीत मारले आणि म्हणूनच या देवतेला श्री लक्ष्मी मल्लमर्दन म्हटले जाते. महिरपीमध्ये  (देतेच्या वरची शिळा)  "श्री लक्ष्मी"श्री विष्णूंच्या मांडीवर बसली आहे. डाव्या बाजूला खाली श्री बलराम आणि उजव्या बाजूला खाली विष्णूचे वाहन गरुड आहे. श्री कृष्ण डाव्या मांडीवर बसून हातातील गदेचा प्रहार मल्लांवर करत आहे असे ते दृश्य आहे. मूर्ती योध्याच्या आवेशात आहे.  

आख्यायिके प्रमाणे हि भली मोठी मूर्ती सापडल्यानंतर एका शिळेला टेकवून ठेवली होती आणि तिच्यावर पूजा अर्चा सुरु झाली. कित्येक वर्ष लोटल्यानंतर ती शिळा पडायला आल्यामुळे कोणाच्या तरी स्वप्नांत भगवंत येऊन दृष्टांताप्रमाणे ती मूर्ती सध्या आहे त्या ठिकाणी आणून ठेवली गेली,  आणि लगेचच ती शिळा घरंगळत खाली गेली. त्यानंतर त्या ठिकाणी प्रथम गवताचे छप्पर असलेले आणि नंतर कौलारू लाकडी देऊळ बांधले गेले. काही कारणामुळे त्या मंदिराला आग लागल्यानंतर,  पुढे दिनांक ऑक्टोबर १९१३ ( विजया दशमी ) चे दिवशी गावातील धुरिणांनी एकत्र येऊन "श्री लक्ष्मी मल्लमर्दन प्रासादिक मंडळ" स्थापन झाले. त्याचे प्रथम अध्यक्ष कै. रामकृष्ण महादेव भोळे होते. ऑक्टोबर १९३७ साली सध्या अस्तित्वात असलेले लोडबेअरिंग चे सिमेंट काँक्रीट चे मंदिर,अलिबाग येथील सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर कै. विष्णुपंत वीरकर यांचे देखरेखी खाली बांधायला सुरवात झाली. मुख्य मंदिर १९४० साली बांधून पूर्ण झाले आणि प्लास्टरिंग, रंगकाम आणि दरवाजे इत्यादी १९५२ पर्यंत पूर्ण झाले. प्रासादिक मंडळाचा भर मंदिर बांधणी आणि दुरुस्ती या विषयावर असल्यामुळे पुढे दिनांक १०/१०/१९४० रोजी बहिरंग शोभा आणि उत्सव व्यवस्थापनावर विशेष लक्ष देण्यासाठी श्री लक्ष्मी मल्लमर्दन प्रासादिक उत्सव मंडळ स्थापन झाले.  २७ मे १९६७ रोजी देवतेवर, शास्त्रोक्त अर्चा विधी झाला. त्या प्रसंगी वे. मू. सूर्यकांत बळवंत भोळे आणि कै. वे. मू. भार्गव एकनाथ भोळे यांनी पौरोहित्य केले.

प्रासादिक मंडळाने कै गणेश रामकृष्ण भोळे यांचे अध्यक्षतेखाली १९६३ साली सुवर्ण महोत्सव आणि १९७५ साली हीरक महोत्सव साजरा केला तर १९९० साली कै नारायण सखाराम वीरकर, डोंबिवली यांचे अध्यक्षतेखाली अमृत महोत्सव साजरा केला. याच मंडळाने दिनांक १३ ते १५ नोव्हेम्बर २०१३ रोजी सुप्रसिद्ध उद्योगपती श्री दिवाकर निमकर, पुणे यांचे अध्यक्षेतेखाली मंडळाचा शतक महोत्सव वीर येथे साजरा केला. प्रमुख पाहुणे डॉ. चंद्रशेखर निमकर होते.

उत्सव मंडळाने सन २००१ साली कै. वे. मू. भार्गव एकनाथ भोळे यांचे अध्यक्षतेखाली हीरक महोत्सव साजरा केला तर २०१५ साली कै. रामकृष्ण विठल वीरकर (डॉ. हरिभाऊ ) यांचे अध्यक्षतेखाली अमृत महोत्सव साजरा केला.

मंदिरात दरवर्षी गोकुळ अष्टमी, भोगी इत्यादी सण मोठ्या उत्साहात पार पडतात.  कार्तिक महिन्यात शुद्ध भागवत एकादशीला कार्तिक उत्सवात दिवस पूजा, आरती,  छबिना, कीर्तन असते आणि द्वादशीला तुलसी विवाह आणि महाप्रसाद असतो.   गेले कित्येक वर्ष पर्यावरणाच्या  परिणामामुळे मूर्तीची झीज होत आहे, हे लक्षात घेऊन दोन्ही मंडळांनी मिळून या वर्षी मूर्तीवर वज्रलेप प्रक्रिया करण्याचे योजले असून त्या दृष्टीने प्रयत्न सुरु आहेत.

श्री लक्ष्मी मल्लमर्दन प्रासादिक मंडळासाठी

श्री माधव गणेश भोळे, (सचिव )

 

वीर गाव, रम्यवीर गाव, रम्य त्या आठवणी ८ (पहाट !!)

 वीर गाव, रम्यवीर गाव, रम्य त्या आठवणी ८ (पहाट !!) पूर्वी आमच्या लहानपणी, कोकणात आम्ही पहाटे उठायचो त्यावेळी उजडत नाही तर आमची काकू म्हशीच्य...