आमच्या वीर गावात पाठच्या व्हरांड्यात कोनकापा दरवळ असतो, पुढे प्राजक्त सकाळी सडा घालतो.
राम भोळे कडील गावठी गुलाब अजून माझ्या मनात दरवळतो.
मागच्या दोन कलमांवर दोन खारकुंड्या एकमेकांत खेळत असतात, सबंध दिवस बघत राहिले तरी कंटाळा येत नाही.
मधूनच ककणेर आपले भले थोरले पंख फडकवत आवाज करून निघून जातो आणि खालच्या बागेत सुतार पक्षी जणू बेलूर च्या चन्नकेशवा मंदिरात कोरीव कामच करत असतो, न थकता.
घरा खालीच नदी आहे, फक्त 30/40 पायऱ्या खाली. दुपारच्या वेळी तेथे गेले तर केलटी (एक प्रकारची मस्तीखोर माकडे) चीऱ्याच्या लाल दगडाचा तुकडा घेऊन पाणी घेऊन दगडावर घासतात आणि गंध म्हणून कपाळाला लावतात ते बघून नक्कीच पटते की मानव यांचाच प्रतिनिधी आहे.
रात्री कधी कधी माकडे ओरडायला लागली की शेजारचे सांगतात, त्या मोगरीच्या गवणावर तेथे शिळेजवळ बिबट्या आला असावा. गावात अलीकडे बिबट्याचा वावर होत असतो.
एकदा लहान असताना, रात्री आमच्या पाठच्या बाजूला डोंगरात, त्याला आम्ही कर्जवचा पऱ्या म्हणतो, तेथे स्मशान आहे, जोरजोरात कोणीतरी 4/ 5 जण बाई माणसे, रडताना आवाज ऐकू आला. शेजारचे दत्तू काका जोरजोरात अस्सल गावठी शिव्या ध्यायला लागले, त्यांनी आवाज चढवला की समोरून आवाज चढे, शेवटी रात्री एक वाजता रडायचे बंद झाले. कोण म्हणतं भुते होती. त्या नंतर दोन दिवस दिवसा सुद्धा, नदीवर गेलोच नाही.
गावात बऱ्याच कथा सांगतात, रात्री पलिते घेऊन लोक पालखी नाचवत सोबळ करणीच्या जाळीकडे (करवनदाची जाळी) कडे जाताना दिसतात वगैरे.
पण खरे सांगू मला कधी त्याची भीती वाटली नाही, कारण आमच्याकडे म्हणतात, तुमचा राखणदार ताठ आहे. राखणदार म्हणजे एक पूर्वपर नाग असतो तो आपले, आपल्या वास्तूचे, रक्षण करीत असतो.
असा आमचा गाव, नसेल जरी का तुमच्या गावसारखा सुंदर तरी तो आम्हाला आवडतो.
माधव भोळे ( 01.5.2020 )
No comments:
Post a Comment