पूर्वी आमच्या वीर, गावाला जायला दोनच मार्ग होते एक म्हणजे एस टी ने माखजन आणि दुसरा म्हणजे बोटीने जयगड मार्गे भातगाव ते वीर.
लहानपणी आमचे वडील दरवर्षी ५ ते १५ एप्रिल दरम्यान जशी तिकिटे मिळतील त्या प्रमाणे आम्हाला गावाला नेत असत आणि ३१ मे ला मुंबईत परत. एकदा गावाला जाताना आम्हाला एस टी ची तिकिटे मिळाली नाहीत आणि वडिलांनी बोटीची तिकिटे काढली त्या वेळी मी ३ री ४ थीत असेन.
आम्ही गिरगावातून घोडागाडी करून भाऊच्या धक्याला गेलो. तेथे चौघुले शिपिंग ची बोट लागली होती. शिडीने बोटीवर चढलो. मोठया २ ट्रंका खाली गुदामात ठेवल्या होत्या आणि हातातील ब्यागा आणि जेवणाची पिशवी आणि पाण्याचा, पितळेचा फिरकी आणि कडीचे झाकण असलेला, तांब्या फक्त जवळ होता. त्यावेळी काही आजच्या सारख्या पाण्याच्या बाटल्या मिळत नव्हत्या. बोटीने १० चे सुमारास भोंगा दिला आणि बोट सुटली.
चारी बाजूला पाणीच पाणी. सुरवातीला किनाऱ्यावर सोडायला आलेले आप्त आणि मित्रमंडळी हात हलवत निरोप देताना दिसत होते पण पुढे ते सुद्धा दिसेनासे झाले. समुद्राच्या खारटपणाचा एक वास हवेत दरवळत होता. मोठमोठ्या लाटांचे आवाज येत आणि कधी कधी तुषार सुद्धा अंग भिजवत.
आम्ही साध्या क्लास ची तिकिटे काढल्यामूळे (त्या वेळी ऐपतही नव्हती स्पेशल क्लासने जायची. स्पेशल क्लासला केबिन मिळायची) आम्ही सर्व मंडळी वरच्या डेकवर होतो. वरती उन्हापासुन संरक्षण होते. आईने चटई आणली होती त्यावर सर्व बसून होती. ही मजा बघता बघता दुपारचे १२ वाजले आणि आईने जेवणाचे डबे काढून केळीच्या पानावर सर्वाना पोळी आणि बटाटा च्या काचऱ्या वाढल्या आणि जेवण झाले. नंतर झब्बू चा डाव रंगला. शेजारच्या कुटुंबातील मुले सुद्धा आमच्या खेळात सामील झाली. असे करता करता दुपारचे २.३० वाजले आणि समुद्रावरून खारे वारे वहायला सुरवात झाली. आमचे पत्ते उडायला सुरवात झाली. बहुतेक मुरुड जंजिऱ्या पर्यंत आम्ही आलो असणार आणि बोट जोरजोरात हलायला लागली त्यातच वाऱ्याचा जोरही वाढला. आम्ही डेकवर हलायला लागलो. जणूकाही भूकम्प होतो तसाच. आम्ही पत्याचा डाव बंद केला. लहान मुले आपल्या आयाना घट्ट बिलगून होती. बाजूच्या कुटुंबातील मंडळींनी कुरमुरे घालून भेळ करायला घेतली होती त्यातील अर्धी भेळ तर वाऱ्याने उडून गेली. आईने नेहमीप्रमाणे प्रार्थना केली की आमचा प्रवास सुखरूप होऊंदे. एक तासभर हे नाटक चालले आणि ३.३० च्या सुमारास समुद्र शांत झाला. हे सगळे आम्हाला नवीनच होते. संध्याकाळी ६.०० वाजता जयगड येणे अपेक्षित होते. परंतु काय कारण माहिती नाही दिवे लागणीची वेळ झाली तरी समुद्र किनारा दिसत नव्हता. ७ वाजता जयगड चा किनारा आला. बोट जयगड बंदरापासून साधारण अर्धामैल दूर लागायची. मग मोठमोठाले पडावं बोटीजवळ आले. पडावात,आमच्या पत्र्याच्या दोन ट्रंका, फेकल्या गेल्या. बाई माणसांना हात धरून मुसलमान हबश्यानी उतरवले आणि आम्हा लहान मुलांना २ हातात २ मुले बकोटीला धरून पडावात अक्षरशः फेकले. सर्व सामान उतरवल्याची खात्री करून बोट पुढच्या मुक्कामाला निघाली आणि आमचे पडावं जयगड च्या बंदराला.
जयगड बंदरात एक भागवतांची शाकाहारी खानावळ होती, त्याच्या आसऱ्याला आम्ही गेलो. आईने गुळ तूप पोळी आधीच तयार करून आणली होती. सर्व मंडळी खानावळीत पेट्रोमॅक्स च्या लुकलूकत्या प्रकाशात जे मिळेल ते जेवली आणि बाहेर पडवीत सर्वांनी पथारी टाकली. रात्री नऊच्या सुमारास भागवत खानावळ बंद करून गेले आणि त्याबरोबर पेट्रोमॅक्स चा उजेड सुद्धा गेला.
दुसऱ्या दिवशी पहाटे जाग आली, प्रथम आपले सर्व बोजे शिल्लक आहेत ना ते मोठ्या माणसांनी बघितले कारण आदल्या दिवशी थकल्यामुळे एवढी गाढ झोप लागली त्यात समुद्राचा थंड वारा म्हणजे स्वर्ग सुखच.
सकाळी सात वाजता जयगड ते कुरधुंडा येथपर्यंत जाणारी एक पॅसेंजर लाँच आली, त्यात आमचे सामान आणि आम्हाला बसायला जागा मिळाली आणि आम्ही मार्गस्थ झालो. हा मार्ग अतिशय सुंदर आहे. परवा केरळ ला गेलो होतो तेथील बॅकवॉटर मध्ये बोटीने प्रवास करताना याचीच आठवण होत होती फरक एवढाच होता की तेथे बॅकवॉटर च्या बाजूला आमच्या सारखे हिरवेगार प्रचंड च्या प्रचंड डोंगर नव्हते. आमच्याकडील काही नदीमार्ग केरळ पेक्षा सुंदर आहेत पण येथील पर्यटन मंडळाला त्याचा मागमूस सुद्धा नाही. हळूहळू लाँचचा नावाडी एखादे स्थानक आल्यावर घंटा वाजवून सूचना देत होता. जांभारी, कुडली, गडनरळ, मोबार पाचेरी, चवे, राई असे मजल दरमजल करीत ११.३० वाजता तापत्या उन्हात आम्ही भातगावला उतरलो. तेथे आमचा मानाजी भोई आपली होडी घेऊन वाट बघत बसला होता. त्याने सर्व सामान होडीत ठेवले आणि आम्ही भातगाव ते वीर या पुढील प्रवासाला मार्गस्थ झालो. हा प्रवास जर माणसांने होडी चालवली तर साधारण पणे पाऊण तासाचा आहे.
जस जसे आमचे गाव जवळ येत होते तसे तसे आम्ही खुश होत होतो. मानाजी गावातील गोष्टी सांगत होता त्यामुळे त्या आनंदात आणखीनच बहार येत होती. शेवटी १२.१५ ला आम्ही वीर बंदर येथे आलो आणि आमच्या गावाला पोहोचलो. मग सर्व सामान बंदरावरील डॉक्टर जनुभाऊ विरकरांच्या घरी ठेवले. जनुभाऊ सर्वांचे आनंदाने आदर सत्कार करीत. सर्व जण गूळ पाणी पिऊन हातातील सामान घेऊन २ किलोमीटर लांब असलेल्या आमच्या गावातील घराकडे निघाले. २६ ते २७ तास प्रवास केल्याचा क्षीण केव्हा विसरलो तेच कळले नाही कारण गावाला जाण्याच्या नादात तो मुळात आलाच नव्हता.
No comments:
Post a Comment