Friday, April 23, 2021

वीर रम्य त्या आठवणी भाग ४

 वीर रम्य त्या आठवणी भाग

आमच्या वीर ला, रावजी काकांची आनंदी काकू म्हणजे लाल पातळ, डोक्यावरून पदर ( पूर्वी विधवा महिलेच डोक्यावरचे केस कापले जायचे म्हणून त्यांना डोक्यावरून पदर घ्यावा लागे). ती बाल विधवा होती. तिला मुलं बाळ नव्हते, परंतु कायम हसतमुख, व्यवहारात हुशार. संपूर्ण घरात एकटी राहायची कारण पतीचे लहानपणीच निधन झालेले.

आमच्या वीरच्या घरी सुद्धा आमची मोठी काकू होती, पार्वती काकू. ती सुद्धा बाल विधवा होती. आम्ही कधी तिला आमच्या काकांबद्दल म्हणजेच तिच्या पतींबद्दल विचारले तर सांगायची तिच्या वयाच्या थ्या वर्षी लग्न झाले, त्यावेळी माझे काका १५ - १६ वर्षाचे होते, त्यांच्या १८ व्या वर्षी ते वारले, तर काय आठवणार ? आणि काय सांगणार? आमची काकू ८० वर्ष पर्यंत जगली. कधीतरी आम्ही तिला मुंबईत आणत होतो पण महिना झाला की तिला गावची ओढ लागे. गावाला आमच्याकडे एक दुभती म्हैस आणि रेडकू असायचे. ती अत्यन्त प्रेमाने त्याचा सांभाळ करे. अशी वयाची ७५ वर्ष तिने आमच्या घरी एकटी काढली. तिला मुलबाळ नसल्याने तिचा सांभाळ आमच्या वडिलांनी आपल्या आईप्रमाणे केला. त्या वेळी मला काही कळत नव्हते पण आज मागे वळून बघितल्यावर कळते आपल्या समाजातील चालीरीती किती निष्ठुर होत्या आणि त्यावेळचे कट्टरवादी किती आग्रही होते की ज्या वेळी ब्रिटिशांनी मुलींचे लग्नाचे कमीतकमी वय १० वर्षावरून १२ वर्षावर नेण्यासाठी ठराव आणला ( 1891, Age of Consent Bill) आणी ज्या साठी राजा राम मोहन रॉय, न्या. महादेव गोविंद रानडे, नामदार गोखले सारख्या अनेक समाजसुधारकांनी प्रयत्न केले, तेव्हा टिळकांसारख्या उच्चशिक्षित नेत्याने सुद्धा "हिंदू धर्मात ब्रिटिशांची ढवळा ढवळ नको" म्हणून या ठरावाला कडाडून विरोध केला. काकू शेवटपर्यंत घरात एकटीच रहायची आणि आम्ही उन्हाळ्यात महिने आणि वडील कार्तिकिमध्ये १० दिवस वीर ला जात होतो. तेवढाच काय तो तिला दिलासा.

आपण ज्या जाड्या पोह्यापासून कांदे पोहे खातो ते पोहे पूर्वी घरी कांडले (तयार व्हायचे) जायचे. मे महिन्यामध्ये आमच्या वीरच्या घरी एक दिवस पोहे कांडण्याचा कार्यक्रम असायचा. आदल्या दिवशी रात्री भात ( अख्खा सालासकट तांदूळ) भिजवलेले असायचे. रात्री आनंदी काकू कंदील घेऊन यायची आणि दुसऱ्यादिवशी ची सर्व तयारी आहे की नाही ते बघून जायची.

आम्ही सकाळी उठून बघतो तर रावजी काकांची आनंदी काकू, सोनिताई नवेले, शांती नवेले, इत्यादी महिला लवकर अंघोळ करून आमच्या पाठच्या पडवीत हजर. त्या वेळी घराला मोठी पडवी होती. पडवी मध्ये एका कोपऱ्यात एक मातीची चूल असायची, तिचा उपयोग फक्त पोहे तयार करण्यासाठी केला जायचा. आनंदी काकूंकडे एका काठीला टोकाला एक लाकडी गोळा आणि त्यावर फडके गुंडाळले ले असायचे. तसेच एक मडके त्याला एक वरती तोंड आणि एक बाजूला भोक असायचे. हे मडके चुलीवर तापत ठेवलेले असायचे, त्यामध्ये पसाभर भिजलेले भात पाणी निथळून झाल्यानंतर वरच्या तोंडातून टाकले जायचे आणि बाजूच्या भोकातून ते फडके असलेला काठीचा गोळा त्याने ते भात तापवले जायचे. पाण्याचा सर्व अंश गेला की पडवीत जवळच असलेल्या वायनांत (जमिनी मध्ये गाडलेल्या उखळीला वायन म्हणतात) हे गरम भात टाकून त्यावर शांती ताई आणि सोनी ताई मुसळीचे घाव अगदी लयबद्ध पद्धतीने घालत. थोड्या वेळाने ते कूट पाखडल्यावर त्या भातावरील सालपटे बाजुला होऊन चपटा पोहा तयार होई. असे करे करे पर्यंत १०.३० वाजत. मग मध्यन्तर होऊन आम्हाला आणि त्यांना नाश्ता होई. मग परत काम सुरू होऊन १२.३० ते वाजे. तेथपर्यंत आई बाकी घरचा स्वयंपाक करीत असे. शांतीताई आणि सोनीताई त्या दिवशी जेवायला असत. त्यांना सुद्धा त्यातील काहींपोहे भेट म्हणून देत असे. पूर्वी कोणी एकमेकाला पैसे देत नसत. एकमेकांनी एक मेकाला मदत करीत असत.

तेथपर्यंत वडिलांची सोवळे लावून पूजा आणि आमची नदीवरील अंघोळ झालेली असायची. वडिलांना सर्व धार्मिक विधी येत असल्यामुळे ते जेवणापूर्वी वैश्वदेव करीत. त्या वेळी त्याचा अर्थ काय कळणार पण सर्व प्राणिमात्र आणि विश्व कल्याणा साठी केलेला तो एक छोटा यज्ञ होता हे नंतर कळायला लागले.

नंतर लाईनिमध्ये सर्व घरातील पुरुष आणि लहान मुलींची पंगत वाढून जेवण होत असे. कोणीही पानात किंवा पानाबाहेर पदार्थ अथवा उष्टे टाकायचे नाही. कुठलीही गोष्ट आवडत नाही असे म्हटले की ती जबरदस्तीने खायला लागायची असा शिरस्ता होता. आजकाल आया एवढे लाड करतात की वडिलांना बोलायची हिम्मतच होत नाही.

संध्याकाळी खेळून वगैरे झाले की देवासमोर दिवा लावल्यावर शुभं करोती म्हणून झाली की बाहेर झोपाळ्यावर येऊन आधी पाढे,मग मोठं मोठ्याने श्लोक आणि स्तोत्र असे म्हटले जायचे. त्यावेळी घरात लाईट नव्हते त्यामुळे सर्व कारभार कंदीलावरच चाले. मग जेवणाला वेळ असेल तर शेजारच्या घरातील मुले भेंड्या खेळायला यायची.

असे आयुष्याचे दिवस मजेत गेले. तेव्हा कोणाचे बर्थडे नव्हते होत की मॅरेज अनिव्हर्सरी नव्हत्या होत पण संसार गोडीगुलाबीने होत होते. प्रत्येक जण आपापली जबाबदारी सांगता पार पाडत असत. एखादा मुलगा एखाद्या वर्षी नापास झाला तरी कोणी टोचून बोललेले मी कधी बघितले नाही आणि तीच मुले पुढे हुशार होऊन जीवनात यशस्वी झालेली मी बघितली आहेत. आजच्या सारखी जीवघेणी स्पर्धा, प्रत्येक गोष्ट पैशात आणि तुझी फियाट तर माझी मारुती, तुझी मर्सिडीस तर माझी फेरारी ही स्पर्धा नव्हती, तरी पण माणसे आनंदी होती. याचा अर्थ ती महत्वाकांक्षी नव्हती असे नाही पण महत्वाकांक्षेबरोबर आपद धर्म होता, माझे गाव, माझा देव, माझी माणसे, माझा देश ही भावना होती.

आता लोक उत्सवाला गावाला येतात, स्वतःची किंवा भाड्याची गाडीघेवुन मित्र घेऊन महाप्रसादाच्या दिवशी सकाळी १० वाजता देवळात हजर. येताना चिपळूण मध्ये गेस्ट हाऊस मधून अंघोळ करून येतात, देवाला पाया पडले, पेटित चार पैसे टाकले, मग ५०१ ची पावती फाडली, महाप्रसाद घेतला, दुपारी ला निघतात. आपण विचारले की अरे एवढ्या लवकर? तर म्हणतात जरा पुढे गोव्यापर्यन्त जातोय, पुढल्यावेळी नक्की वेळ काढून येईन. फेसबुकवर एक फोटो आणि पोस्ट टाकतात, देवदर्शन छान झाले, गावाला जाताना रस्ता फार खराब होता, अजून गाव मागेच आहे, तिकडे गोव्यात सुधारणा छान झाल्या आहेत.

माधव भोळे ( 16.05.2020)

 

No comments:

Post a Comment

वीर गाव, रम्यवीर गाव, रम्य त्या आठवणी ८ (पहाट !!)

 वीर गाव, रम्यवीर गाव, रम्य त्या आठवणी ८ (पहाट !!) पूर्वी आमच्या लहानपणी, कोकणात आम्ही पहाटे उठायचो त्यावेळी उजडत नाही तर आमची काकू म्हशीच्य...