वीर गाव रम्य त्या आठवणी - भाग ६
मे महिना सुरू झाला की आमच्या घरी वीर गावाला जायचे वेध लागतात. परंतु गेल्यावर्षी लोकडाऊन सुरू झाला आणि आमची गाडी मालाड मध्येच अडकली. मग वीर मधील आठवणी म्हणून सत्र लिहायल सुरवात झाली. यावर्षी सुद्धा अशीच काहीशी परिस्थिती होईल असे वाटते. या वेळी काही वीरकर व्यक्तिरेखा लिहिणार आहे ज्या मला माहिती आहेत.
आजकाल कम्पाउंडर,
कम्पाउंडर नावाने बरीच चर्चा सुरू असते. कम्पाउंडर म्हटले म्हणजे वीरकरांना दोनच व्यक्ती
माहिती एक म्हणजे कृष्णाजी पंत वीरकर आणि दुसरे मुकुंदराव वीरकर (बोरिवली).
प्रथम कृष्णाजीपंत
बद्दल लिहुया. आजकाल आपल्या गावातील 80 वर्षाचे हिरो जगदीश कृष्णाजी वीरकर, ठाणे यांचे
ते पिताश्री. ते गिरगावात संतीण बाईचा मठ या वाडीत रहायचे. एक छोट्या अंधारी खोलीत
जगदीश, जगदीश चे वडील कृष्णाजी पंत, काका विष्णुपंत,
काकू आणि काकूंच्या दोन मुली आणि मुलगा अनिल म्हणजे एकंदर 7 माणसे. आमची मुले म्हणतात
एवढ्या लहान खोलीत तुम्ही एवडी मंडळी रहायलीच कशी? काय सांगणार? त्यावेळी लोक शिक्षित
नव्हते, चांगले पगार नव्हते, अन्न, वस्त्र, निवारा या संसाराच्या मूलभूत गरजा भागवतानाच
जीव मेटाकुटीला यायचा.
तर कृष्णाजी
पंत नवेवाडीतील कोपीकर डॉक्टरांच्या दवाखान्यात काम करत. त्यामुळे औषध व्यवस्थेचा अनुभव
दांडगा. त्यावेळी विरकरांना एम बी बी एस डॉक्टर काय असतो हे समजून घेण्याची कधी गरजच
भासली नाही, ऐवढे कृष्णाजी पंत हुशार होते. सर्व त्यांना डॉक्टरच म्हणत. आत्मविश्वास
होता, अनुभव सुद्धा होता. त्यांनी औषध दिल्यावर
माणूस दुसऱ्या दिवशी खडखडीत बरा व्हायचा. साध्या सर्दी, ताप, खोकला याला तर लोक कृष्णाजी
पंतांकडेच यायचे. ते जरुरी प्रमाणे औषधे देत. कधी कुणाला उगीचच टेस्ट करायला किंवा
मोठ्या डॉक्टरला दाखव असे म्हणाले नाहीत. फी तर अगदीच माफक असायची (म्हणून कदाचित गिरगावातील
अंधाऱ्या खोलीत रहात असावे). आमची आई आम्हाला त्यांच्याकडे घेऊन जायची. वडील तर आठवड्यातून
एक दिवस मित्र म्हणून चक्कर मारत असत. जास्त सर्दी खोकला झाला असेल तर एक इंजेक्शन
ठोकायचे आणि मस्करीत म्हणायचे काही नाही वांग्याची भजी खा, खोकला जाईल पळून. त्यांना
आणि त्यांच्या बंधूना सुद्धा बारमाही खोकला असायचा. पण पूर्वी लोक आतासारखे घाबरलेले
नव्हते.
१९६५ साली
माझी मुंज याच संतीण बाईच्या मठाच्या हॉल मध्ये झाली. आम्ही कोळीवाडीतून सकाळी 7 वाजता,
मोठी घोडागाडी ( Victoria) मध्ये सर्व सामान आणि 5 ते 6 चिलीपिली आणि आई, बहीण यांचेंबरोबर
हॉल कडे जायचा निघालो आणि मोठ्या मुगभाटात संतीण बाईच्या मठाकडे गाडी वळणार तेवढ्यात
गाडीवाल्याने गडबड केली आणि घोड्याला चुकीचा वळवला आणि सम्पूर्ण गाडी समानासकट माझ्या
अंगावर पडली. मी 10 वर्षाचा, गाडीचे वजन 300 किलो तरी असणार. गाडीचे लोखंडी पायदान
माझ्या मानेवर रुतले होते. आई घाबरली. ओरडाओरड झाली आणि रस्त्यावर वरील मंडळीं पटकन
मदतीला धावून आली. प्रथम गाडी उचलून मला बाहेर
काढले. आई हुशार होती, वडील येईपर्यंत थांबली नाही, सरळ एका माणसाला सांगून मला उचलून,
कृष्णाजी पंतांकडे घेऊन गेली, जे त्या हॉल च्या वरच पहिल्या मजल्यावर रहात होते. मी
तर बेशुद्धच होतो. मानेला 4 इंचाची आडवी जखम झाली होती. त्यात कसलीशी काळी पावडर भरली
आणि वरून बँडेज लावले. एक इंजेक्शन आणि 3 दिवसाला गोळ्या दिल्या. टाके नाही नि काही नाही आणि म्हणाले काही काळजी करू नका. तेथपर्यंत
8.30 वाजले. 11 वाजण्याच्या मुहूर्त. कसले बटू भोजन आणि कसली मुंज. सर्व बेशुद्ध अवस्थेतच
पार पडले. आईने केलेले बुंदीचे लाडू, 15 किलोची दही लावलेली चिनीमातीची बरणी आणि भिक्षावळीचे
समान सर्व रस्त्यावर फुकट गेले आणि आहे त्या स्थितीत मुंज पार पडली कारण सर्व नातेवाईक
आधीच हॉलवर आले होते.
पूर्वी पैसे
नाहीत म्हणून कधीच कोणाचे अडले नाही किंवा कोणी आत्महत्या केलेले मी ऐकलं नाही. आहे
त्यात दिवस साजरा करायचा आणि येईल त्या प्रसंगाला तोंड द्यायचे हीच शिकवण होती. एकदा
वीर येथे कार्तिकीचे नाटक होते. कृष्णाजी पंतांची सुद्धा भूमिका होती. ज्या दिवशी नाटक
होते त्यादिवशी त्यांचे लहान बाळ अचानक आजारी होऊन वारले. सर्व ग्रामस्थ कृष्णाजी पंतांबरोबर
होते. आता नाटक कसे पार पडणार या विचारत नाट्य मंडळी होती. आपले सर्व विधी उरकल्यानंतर
त्यांनी माझ्या वडिलांना बोलावून सांगितले, तुम्ही दुसरे पात्र शोधू नका. हे देवकार्य
आहे आणि मी उत्सवात भाग घेणार नाही पण नाटक पूर्ण करून बाहेर पडेन. वडिलांनी त्यांना
नको म्हटले पण ते म्हणाले, हे माझे वयक्तिक दुःख आहे, पण सार्वजनिक ठिकाणी वीरचे नाटक
पडले हे मला ऐकायला वाईट वाटेल. त्यादिवशी देवाजवळ प्रार्थना करून सुतकात सुद्धा कृष्णाजी
पंतांनी आपली भूमिका चांगली निभावली. त्यांना दुःख नव्हते असे नाही पण वयक्तिक दुःखापेक्षा
कर्तव्य जास्त महत्वाचे वाटले. नाहीतर आजकालची मुले जरा काही अडचण वाटली की मंडळाचा
राजीनामा देऊन मोकळे होतात.
कृष्णाजी
पंतांची ही कृती बघून मला नेहमी लोकमान्य टिळकांची आठवण येते. त्यांचा मुलगा विश्वनाथ
टिळक हा अल्पवयीन असताना वारला त्या दिवशी त्यांच्या सहकाऱ्यांनी सांगितले की उद्याचा
केसरी दुखवटा म्हणून काढू नका. टिळक स्मशानातून घरी येऊन केसरीच्या कचेरीत गेले. म्हणाले
सर्व देश केसरीची आतुरतेने वाट बघत असतो. काळ थांबत नसतो. विश्वनाथ वारला हे माझे वयक्तिक
दुःख आहे ते मी सर्व वाचकांना का वाटू? केसरी चा उद्याचा अंक सुद्धा निघणारच.
असो अशा कृष्णाजी
पंतांना माझे शतशः प्रणाम.
No comments:
Post a Comment