वीर गाव - रम्य त्या आठवणी भाग ५
१९२५ ते ६० चा काळ म्हणजे मराठी संगीत रंगभूमीचा सुवर्ण काळ. त्यावेळी गावागावात संगीत नाटकांची चढाओढ लागत असे. मानापमान, संशयकल्लोळ, एकच प्याला, पासून ते अगदी ऐत्यीहासिक बेबंदशाही, रणदु्धूम्बि नाटका पर्यन्त सर्व प्रकारची नाटके होत होती. त्या वेळी आता सारखे शेकडो चॅनल नव्हते त्यामुळे मनोरंजनपर कार्यक्रम म्हणजे गावात पर्वणीच. लांबून लांबून लोक नाटक बघायला येत.
त्या वेळी आमच्या गावात दोन नाट्यमंडळी होती. श्री लक्ष्मी मल्लमर्दन च्या कार्तिक उत्सवात आपले नाटक चमकले पाहिजे या साठी दोन्ही मंडळी खुप मेहेनत घ्यायची. जसे भारत पाकिस्तान क्रिकेट सामन्याचे वेळी वातावरण असतेे त्याप्रमाणे आमच्या गावात नाटकाच्या तयाऱ्या होत. दोन्ही मंडळात गावातील आणि मुंबईतील लोक चढाओढीने भाग घेत. एकाच घरात बाप एका मंडळात तर मूलगा दुसऱ्या मंडळात असायचा अशाही केसेस होत्या. एरवी मुंबईत एकमेकांना भेटून खुशाली विचारणारे गाववाले चातुर्मासात फक्त आपल्या मंडळातील लोकांना भेटायचे, कारण कोण कुठले नाटक करत आहे याचा पत्ता दुसऱ्या मंडळाच्या सभासदांना लागता कामा नये.
उत्सव तीन दिवस चाले. पहिल्या दिवशी रात्री एकादशीचे मुख्य कीर्तन, द्वादशीला दुपारी महाप्रसाद, त्रयोदशीला रात्री करमणुकीचा कार्यक्रम म्हणजे बहुतेक नाटक. खरे म्हटले तर २ ऱ्या दिवशी आणि ३ ऱ्या दिवशी रात्र मोकळी असायची पण प्रत्येक मंडळाला ३ ऱ्या दिवशीच नाटक सादर करायचे असे. त्या साठी रात्री ८ ते १२ एक नाटक आणि परत रात्री १२.३० ते पहाटे ४.३० दुसरे नाटक अशी वेळ आखून घेतली असायची. या पैकी पहिले नाटक कोणी करायचे या वरून वाद होई कारण दुसऱ्याला पूर्व तयारी करायला फक्त अर्धा तास मध्यन्तर मिळे. या वरून आमची काही अतिउत्साही मंडळी अंजनवेलच्या (गुहागर) कोर्टातून ऑर्डर आणून पोलिस पहाऱ्यात पहिले नाटक बरोबर १२ वाजता नाटक बंद करायला लावत असे मी आयकले होते. एवढी चढाओढ. (अंजनवेल,गुहागर आणि वीर मध्ये ७७ किमी चे अंतर आहे. )
आषाढी एकादशीला शुभारंभाचा नारळ फुटून तालीम सुरू होत होती. बहुतेक लोक गिरगाव ते दादर दरम्यान रहात त्यामुळे तालिमा रात्री होत. सुरवातीला शनिवार रात्र ते रविवार रात्र आणि जसजसे दिवाळी जवळ आलीे की आठवढ्यातून तीन दिवस. शेवटी हॉल घेऊन रंगीत तालीम सुद्धा होई. त्यावेळी सर्वच लोक पैसेवाले नव्हते, पण अनेक जण दुसऱ्या गरीब गाववल्याचे तिकीट काढून त्याला उत्सवाला नेत. मुंबईतुन तबला, पेटी, ऑर्गन तसेच ४ ते ७ दिवसाचे भाडे देऊन सुद्धा नाटकाचे ड्रेस आणि पडदे गावाला नेले जात. हे सर्व बोटीने मुंबई ते जयगड, जयगड ते भातगाव, भातगाव ते वीर असा ३६ तासाचा प्रवास करून नेत. त्या काळी कुलीन घरातील स्त्रिया नाटकात काम करीत नव्हत्या. त्यामुळे गोरेगोमटे पुरुष कपाळाला कुंकू आणि गळ्यात दागिने घालून स्त्री पात्र करीत. कै.पदनाभ वामन वीरकर (उर्फ गजू भाऊ), कै. बावा गुरव, कै. अनंत (शिवराम) एकनाथ भोळे अशा सारख्यानी स्त्री पार्ट केले तर कोणाला ओळखता पण येत नसे की हे पुरुष आहेत म्हणून. म्हणतात ना हौसेला मोल नसते.
एक भिवा नावाचा स्वयंपाकी होता. त्याचे लग्न झाले नसल्यामुळे त्याचे कुटुंब नव्हते. वर्षभर राबराब राबून मुंबईत पैसे कमवायचा, स्वतः साधा रहायचा आणि कार्तिक उत्सवात नाटक, फटाके, महाप्रसाद यावर तो खूप खर्च करी. गावातील गरीब मुलांना कपडे, मिठाई आणि फटाके वाटे.
पुढे या दोन्ही मंडळातील वाद मिटून एक मंडळ झाले आणि एक नाटक होऊ लागले. गावातील मंडळी आणि मुंबईतील मंडळी तसेच त्यांचे मित्र उत्साहाने नाटकात सहभागी व्हायला लागले.
एकदा आमच्या गावाला शिवजयंती उत्सवाचे नाटक "संशय कल्लोळ" होते. आम्हि त्यावेळी ४ थी ५ वीत असणार. मला माहित नव्हते आमचे वडील त्यादिवशी मुंबईहुन वीरला येणार होते. आम्ही वडिलांना मामा म्हणायचो. त्यावेळी नाटकमंडळीकडे ३ / ४ पात्रे कमी होती. आम्ही जेवून रात्री शाळेच्या पटांगणात जेथे नाटक होणार होते तेथे येऊन जागा अडवून बसलो होतो. नाटक सुरू झाले. प्रथम प्रवेश भादव्या या पात्राचा होता. खाकी हाल्फ पॅन्ट, पांढरा हाल्फ शर्ट, डोक्यावर तिरपी काळी टोपी आणि कानावर पांढरे फुल असे पात्र, घर गड्याचे काम, स्वतःशी पुटपुटत टेबल साफ करीत होता. आवाज ओळखीचा वाटत होता. पण लक्षात येत नव्हते. तेवढयात कोणतीतरी म्हणाले मामा कधी आले? तरी मला कळले नाही. नंतर थोड्या वेळाने साधूच्या वेशात सुद्धा त्याच आवाजात गाणे "हृदयी धरा हा बोध खरा" हे गाणे ते म्हणत होते. त्यावेळी सुद्धा लोक मामा, मामा म्हणत होते. असे एकंदर चार रोल त्यांनी आयत्या वेळी केले. दुसऱ्या दिवशी चर्चा झाली त्यावेळी मला कळले की गावातील मुलांना माहीत झाल होतेे की आज मामा मुंबईतून येणार आहेत तर त्यातील दोघेजण एसटी वर त्यांना आणायला गेले. वडील सकाळ पासून १० तास प्रवास करून आले होते. एकाने त्यांची ब्याग पकडली, आणि आपली अडचण सांगितली. खरे म्हणजे वडील थकले होते, पण मुलाना नाराज करायचे नाही आणि गावचे नाटक पडता कामा नये या भावनेने त्यांनी होकार दिला. घरी जाऊन फ्रेश होऊन थोडे खाऊन ते ताबडतोब ८.३० ला मेकप रुम मध्ये हजर झाले आणि त्यांनी ४ पात्रांच्या भूमिका आढेवेढे न घेता केल्या. माझे वडील अतिशय शिस्तप्रिय आणि लोकांना थोडे कडक वाटायचे, पण त्यांचा हा पैलू मला त्याचवेळी माहिती झाला. पूर्वी अनेक लोकांना नाटके पाठ असायची त्याचा असा फायदा. तो प्रसंग मी अजूनही विसरू शकत नाही. तीच गोष्ट आमचे डॉक्टर कम कम्पाउंडर कै कृष्णाजी वीरकर यांचे बाबतीत झाली, एका कार्तिकीला नाटकाच्या दिवशीच त्यांचे कोणी जवळचे नातेवाईक दगावले होते, शोक तर होताच पण आयत्यावेळी पात्रं कोठून आणणार, नाहीतर नाटक रद्द करायला नको म्हणून देवाला प्रार्थना करून माफी मागून रात्री नाटकात काम केले. स्वतःच्या दुःखा पेक्षा इतरांचे सुख महत्वाचे मानणारी ही मंडळी.
काही वर्षे कै. पदनाभ वामन वीरकर यांनी वीरमधील नाटके त्यांचे सहकारी कै. दिगंबर काळे, श्री अशोक मुळे, आर्टिस्ट कै. गजानन वीरकर इत्यादी लोकांना घेऊन वीरची रंगभूमी गाजवली. काही दिवसांनी ही मंडळी वयस्कर झाल्यानंतर पुढली फळी आली. पण त्यांच्यामध्ये गावाच्या आत्मीयतेचा भाग कमी आणि मला संभाजी ची भूमिका दिली तर "इथे ओशाळला मृत्यू" नाटक करायचे किव्वा "गारंबीचा बापु" मध्ये मीच बापू चा रोल कसा चांगला करू शकतो हे पटवून देणासाठी वेगवेगळ्या युक्त्या वापरल्या जायच्या. एवढेेच काय पण मी नटी आणतो, तिचा मी सर्व खर्च करतो, पण आपण अमुक नाटक करूया असे प्रस्ताव सुद्धा मी आयकले आहेत. म्हणजे बाकीच्या पात्रांच्या बद्दल काही विचार नाही, फक्त मी आणि माझे. आपल्याला शोभो, न शोभो, जमो, न जमो पण मला शेण लावा आणि बैल म्हणा ही वृत्ती वाढत गेली.
त्या वेळीसुद्धा कै सुहास शेंडे सारखे दुसऱ्या गावातील दिगग्ज कलाकार आमच्या नाटकात हौशीने आणि आपुलकीने काम करत आणि जे द्याल ते काम. त्यांच्याबरोबर कै सूर्यकांत शेम्बेकर, कै. सूर्यकांत वीरकर नवेले सारखी हरहुन्नरी माणसे नाटकात काम न करता, पेट्रोमॅक्स च्या बत्त्या साफ करून त्या व्यवस्थित चालत आहे की नाही इथपासून ते अगदी स्टेजवर वर चढून पडदे लावण्यापासून तो पडदा बरोबर उघडतो बंद होतो की नाही. पाठच्या विंगा आणि सर्व पडदे नीट लावण्यापर्यंत सर्व कामे बिनचूक आणि नखरे न करता करीत. ह्या सर्व देवसेवा आहेत असे ते मानत आणि देवाच्या दारात पडेल ते काम करायची त्यांची तयारी होती.
पुढे मी नाट्यमंडळाचा सेक्रेटरी झालो परंतु पैसे जमा करणे आणि नाटकाचा जमाखर्च ठेवणे या पलीकडे मला नाटकाचे काही ज्ञान नव्हते. एखादी पोस्टमन किंवा सफाई कामगारांची भूमिका केली म्हणजे डोक्यावरून पाणी. एकदा नाटक सुरू असताना कडाक्याची थंडी पडली आणि नेहमीचे चहा करणारे लवकर घरी गेले होते. कलाकारांना चहा पाहिजे होता पण कोण करायला पुढे येत नव्हते. मी घरी दोन तीन कप चहा करत होतो पण ४० कप चहा कधी केला नव्हता. पण धीर केला आणि अंदाजे सर्व साहित्य टाकून तो बनवून सगळ्यांना नेऊन दिला हीच काय ती रंगभूमीची सेवा.
काही गावात नाटक हे एक लाँचिंग प्याड होत असत. माझ्या मामाच्या गावात जी मुलगी नाटकात, पहिल्यांदा काम करायची ती पुढल्यावर्षी जोड्याने लक्षमी नारायणाला भेटायला यायची अशी तेथील रंगमंचाची ख्याती झाली होती.
असो आज अनेक गावांत नाटके होतात, आमच्या गावातील नाटक जवळजवळ बंद झाल्या सारखे आहे याचे मुख्य कारण आता गाववाले गिरगाव मध्ये न रहाता विखुरले गेले आहेत तसेच कामाच्या वेळा वाढल्यामुळे लोक नाटकात काम करायला वेळ देऊ शकत नाहीत. तसेच मनोरंजनाचे चॅनल वाढल्या मुळे गावातील प्रेक्षकांना सुद्धा पहिल्या एवढी गोडी राहिली नाही. पण दर्जेदार नाटकाला अजूनही लोक लांबून लांबून बघायला येतात ते सुद्धा तेवढेच खरे.
नाटक म्हणजे स्वतःचा आणि टीमचा परफॉर्मन्स याचा सुरेख संगम. दिग्दर्शक, कलाकारांबरोबर च बॅक स्टेज वाल्यांची सुद्धा ती परीक्षा असते. २ / ३ महिने मेहेनत करून ३ तासात परीक्षा सर्वांसमोर ध्यायचे ते एक आनंदाने स्वीकारलेले आव्हानच.
कधीतरी या सर्वांवर लिहायची इच्छा होती ती आज काही प्रमाणात पूर्ण झाली.
माधव भोळे (23.05.2020)
No comments:
Post a Comment